Paaru Serial Off Air : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय ठरलेली ‘पारू’ ही मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने जवळपास दोन वर्षे घराघरात स्थान निर्माण केले. मात्र १० फेब्रुवारी २०२६ नंतर या मालिकेचा एकही नवीन भाग प्रसारित झाला नाही. परिणामी, मालिका अचानक बंद झाली का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला होता. विशेष म्हणजे, मालिकेचा शेवट जाहीर न करता प्रसारण थांबल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झाले. कलाकार किंवा निर्माते यांच्याकडूनही अधिकृत माहिती न आल्याने चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, मालिकेत ‘पारू’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून अखेर याबाबत स्पष्टता दिली. तिने सांगितले की, १० फेब्रुवारी २०२६ रोजी मालिकेचा शेवटचा भाग तयार झाला होता आणि सुमारे ७०० भागांचा प्रवास याच दिवशी पूर्ण झाला. शरयूने प्रेक्षकांचे आभार मानताना सांगितले की, दोन वर्षे सातत्याने मिळालेल्या प्रेमामुळेच मालिका इतक्या मोठ्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकली. मात्र मालिका बंद होणार असल्याची पूर्वकल्पना कलाकारांनाही नव्हती, असेही तिने नमूद केले. त्यामुळे हा निर्णय संपूर्ण टीमसाठी धक्कादायक ठरल्याचे तिने स्पष्ट केले.
आणखी वाचा – निरंजन कुलकर्णीच्या लग्नाच्या तारखेचे गुपित समोर, जूनमध्ये नाहीतर ‘या’ महिन्यात पार पडलंय लग्न ; म्हणाला…
सर्वांत मोठी खंत म्हणजे, काही तांत्रिक अडचणी आणि प्रोडक्शनमधील समस्यांमुळे मालिकेचा अंतिम भाग टीव्हीवर प्रसारितच होऊ शकला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना हवा तसा शेवट पाहता आला नाही, याबद्दल शरयूने मनापासून भावना व्यक्त केली. मालिका संपली असली तरी प्रेक्षकांशी असलेले नाते कायम राहील, असे सांगत तिने लवकरच नव्या प्रकल्पातून भेटण्याचे आश्वासन दिले. “तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी कायम महत्त्वाचे आहेत,” असे म्हणत तिने चाहत्यांचे पुन्हा एकदा आभार मानले.‘पारू’ मालिकेचा असा अचानक झालेला शेवट, अजूनही प्रेक्षकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.





