गेल्या काही वर्षात गाजलेल्या मराठी नाटक, चित्रपट व मालिकांशी जोडलं गेलेलं नाव म्हणजे सुबोध भावे. छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा, सुबोध भावे या नावाची जादू कायमच पाहायला मिळाली. फक्त अभिनयच नव्हे तर दिग्दर्शन आणि निर्मितीतही त्याने आपलं नाव कामावलं आहे. या सर्वच क्षेत्रात तो यशस्व वाटचाल करताना दिसत आहे. नाटकांमधून मालिका आणि मग चित्रपट करत सुबोध आता एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय होतोय. सुरुवातीला त्यानं ‘आभाळमाया’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘वादळवाट’, ‘अवघाचि संसार’, ‘तुला पाहते रे’, ‘अवंतिका’, ‘कळत नकळत’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. (Subodh Bhave Son Football Gold Medal)
दिग्दर्शन, चित्रपट करत असतानाही सुबोधनं छोट्या पडद्याला दूर केलं नाही. ‘चंद्र आहे साक्षीला’ , ‘तुला पाहते रे’ या मालिकांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं आणि आता तो ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सुबोध भावे हा मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याच्या मुलांना या क्षेत्राबद्दल फारशी आवड नसल्याचे दिसून येते. सुबोधला दोन मुलं असून एकाचं नाव कान्हा आणि एकाचं नाव मल्हार असं आहे. यापैकी मल्हार हा उत्तम फुटबॉलपटू असून नुकतीच त्याने या खेळात एक मोठी मजल मारली आहे.

मल्हारने ‘मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन’च्या १६ वर्षांखालील वयोगटाच्या मुलांच्या फुटबॉलच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं आहे. याबद्दल सुबोधने सोशल मीडियावर मुलासाठी खास पोस्ट करत लेकाचे अभिनंदन केलं आहे. सुबोधने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेकासाठी खास पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “अभिनंदन मल्हार भावे आणि तुझी संपूर्ण टीम, ‘मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन’च्या १६ वर्षांखालील वयोगटाच्या फुटबॉलच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल… सदैव प्रेम!”
दरम्यान, सुबोध भावे हा नाटक, चित्रपट, मालिका यांमध्ये कार्यरत असतानाचे तो दिग्दर्शन व निर्मितीची धुराही उत्तमपणे सांभाळत आहे. लवकरच त्याचा ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका सुबोध भावे साकारणार असून याचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.