दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ‘पुष्पा २’ च्या चित्रपट प्रीमियरदरम्यान संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर मृत महिलेचा पती मोगादपल्ली भास्कर यांनी पत्नीच्या मृत्यूला अल्लू अर्जुन जबाबदार असल्याचे म्हंटले होते. यानंतर अल्लू अर्जुनच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यानंतर आज शुक्रवार (१३ डिसेंबर) रोजी अल्लूला अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणी सुनावणी करण्यात आल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. तसेच अनेक प्रतिक्रियादेखील उमटताना दिसून येत आहेत. (Pushpa 2 Allu Arjun Arrested)
अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर आता मृत महिलेचा पती भास्कर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी तक्रार मागे घेण्यासाठी तयार आहे. मला अल्लू अर्जुनच्या अटकेसंदर्भात कोणतीही कल्पना नव्हती. चेंगराचेंगरीमध्ये माझ्या पत्नीचा मृत्यू झाला त्याच्याशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही”. भास्करच्या या वक्तव्यानंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. अर्जुनने देखील त्या महिलेच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासनदेखील दिले होते. त्याने कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर करुन संपूर्ण चाहतावर्गाची माफीदेखील मागितली होती. या मदतीमुळे कदाचित त्या महिलेच्या पतीने तक्रार मागे घेण्याचा विचार केला असावा असे अंदाज बांधले जात आहेत.
दरम्यान CNN व News18 नुसार, अल्लू अर्जुनविरुद्ध हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याशिवाय, संध्या थिएटरवर फौजदारी निष्काळजीपणासाठी कलम 105 आणि 118(1) BNS सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आले असून चौकशीसाठी पोलिस स्थानकात नेण्यात आले होते. मात्र आता मृत महिलेच्या पतीच्या वक्तव्यानंतर अल्लू अर्जुनची न्यायालयीन कोठडी कमी होणार का? असे अनेक प्रश्नदेखील उपस्थित होत आहेत.