सध्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या खूप चर्चेत आला आहे. पुष्पाच्या दुसऱ्या भागाला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. मात्र चित्रपट प्रदर्शनापूर्वी म्हणजे ४ डिसेंबरला हैद्राबाद येथील संध्या चित्रपटगृहात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू आणि तिची दोन मुलं जखमी झाली होती. यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. दरम्यान या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आले असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. मात्र हे प्रकरण इतके का वाढले? प्रीमियरच्या दिवशी नक्की काय घडले? याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (Pushpa 2 Allu Arjun Arrested)
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाचा बुधवारी हैदराबादमध्ये प्रीमियर झाला यावेळी तिथे बरीच चेंगराचेंगरी झाली. संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तसेच दोनजण जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्याला पाहण्यासाठी गर्दी जमल्याने हा गोंधळ उडाला होता. अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ आज ५ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. एक दिवसआधी बुधवारी रात्री आरटीसी चौकात असलेल्या संध्या थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला होता. यामध्ये एका ३९ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. तसेच मृत महिलेच्या मुलांची प्रकृतीदेखील चिंता जनक होती.
दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनने स्वतः कुटुंबियांची आणि चाहत्यांची माफी मागितली. तो म्हणाला की, “मृत महिलेच्या कुटुंबाला तो स्वतः प्रत्यक्षात जाऊन भेटणार आहे. या कठीण प्रसंगी महिलेचे कुटुंबं एकटे नाही. मी त्यांच्याबरोबर असणार आहे. कुटुंबासाठी जे काही करता येईल ते मी सगळं करेन. मी मृत महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच उपचार व औषधांचा सर्व खर्चदेखील करणार आहे”. मात्र अल्लू अर्जुनला शिक्षा व्हावी यासाठी काही जणांनी मागणी केली होती.
अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली आहे. यामध्ये आता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेता पोलिसांबरोबर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याची पत्नी स्नेहा रेड्डीही दिसली. या व्हिडीओ व फोटोंमध्ये अल्लू पांढऱ्या रंगाच्या कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसत होता.