कलाक्षेत्रामध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. मराठी, हिंदी कलाकारांसह दाक्षिणात्य कलाकरांच्या लग्नाचाही सोशल मीडियावर बोलबाला सुरु आहे. यामध्येच आता दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलचा समावेश झाला आहे. अमालाचं रविवारी (५ नोव्हेंबर) लग्न अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. या विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते आहेत. अमालाने बॉयफ्रेंड जगत देसाईबरोबर लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर सोशल मीडियाद्वारे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (South Actress Amala Paul Marriage)
२६ ऑक्टोबर रोजी म्हणजेच अमालाच्या वाढदिवशी जगतने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिने यावर जगतला होकार दिला. अमालाने तिच्या या लग्नात कसलाही थाटमाट न करता अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले. त्यांच्या या लग्नाचे फोटो जगत देसाईने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर आनंदाची बातमी दिली.
या फोटोंमध्ये अमालाने लेव्हेंडर रंगाचा लेहेंगा परिधान केला असून जगतने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर लॅव्हेंडर रंगाचा जॅकेट घातलं आहे. या फोटोंमध्ये दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत. तसेच दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा आहे. अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत अमाला व जगतला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा साखरपुडा संपन्न, साधेपणाने वेधलं लक्ष, खास फोटो समोर
अमालाचे हे दुसरे लग्न असून तिचा पहिला संसार अवघ्या तीन वर्षातच मोडला होता. अमालाने दिग्दर्शक एल. एल. विजयबरोबर पहिलं लग्न केलं होतं. २०१७ मध्ये अमालाने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर तिची मैत्री जगतबरोबर झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अमालाने २००९साली आलेल्या ‘नीलथामरा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्याही विशेष पसंतीस पडली. तसेच अमालाने मल्ल्याळम, तेलगू, तामिळ या भाषांतील मालिकांमधूनही काम केले आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘भोला’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली.