तमिळ सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे ती म्हणजे तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचं निधन झालं. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार त्यांना आरोग्याच्या तक्रारी होत्या. शनिवारी रात्री अकरा वाजता त्यांच्या प्राणज्योत मालवली. दिल्ली गणेश यांच्या निधनामुळे तामिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिल्ली गणेश यांचं शनिवारी (०९ नोव्हेंबर) रोजी रात्री चेन्नईत एका रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यावर आज रविवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. (Delhi Ganesh Passed Away)
दिल्ली गणेश यांच्या निधनाने कुटुंबियांसह चित्रपटसृष्टीलादेखील धक्का बसला आहे. सहकलाकार आणि दिग्गजांनी दिल्ली गणेश यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. दिल्ली गणेश यांच्या मुलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. मुलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि असं म्हटलं की, “आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमचे वडील डॉ. दिल्ली गणेश यांचे ०९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजता निधन झाले आहे”.
दिवंगत अभिनेत्याचे खरे नाव गणेश होते. पण दिल्ली गणेश हे रंगमंचाचे नाव त्यांना चित्रपट निर्माते के. बालचंद्र यांनी दिले होते. वयाच्या ३२ व्या वर्षी दिल्ली गणेश यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९७६ मध्ये के बालचंद्र यांच्या ‘पत्तीना प्रवेसम’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर जवळपास ४०० चित्रपटांमध्ये दिल्ली गणेश यांनी काम केलं. यात तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे.
चित्रपटांशिवाय त्यांनी टीव्ही मालिकांमधूनही आपली छाप उमटवली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते दिल्लीस्थित थिएटर मंडळी दक्षिण भारत नाटक सभेचे मेंबर होते. इतकंच नाही तर भारताच्या हवाई दलातसुद्धा त्यांनी काम केलं होतं. १९६४ ते १९७४ या कालावधीत ते भारतीय हवाई दलात कार्यरत होते.