स्टार प्रवाह वाहिनी मनोरंजनासाठी प्रेक्षकांच्या भेटीला अनेक नवनवीन मालिका घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी वाहिनीने निवेदिता सराफ यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली होती. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ असं या मालिकेचे नाव आहे. अशातच आता वाहिनीने आणखी एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे आणि या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे, ज्यातून काही मुख्य कलाकारही समोर आलेले पाहायला मिळत आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ असं या आगामी नवीन मालिकेचे नाव आहे. तसंच प्रोमोच्या माध्यमातून नव्या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली आहे. (Mrunal Dusanis New Serial)
या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ‘स्टार प्रवाह’ने सप्टेंबर महिन्यात मृणाल दुसानिस पुनरागमन करत असल्याचं जाहीर केलं होतं. तब्बल ४ वर्षांनी भारतात परतलेली मृणाल कोणत्या मालिकेतून पुनरागमन करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अखेर या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. मृणाल बरोबरच या मालिकेत अभिनेता विवेक सांगळे, विजय आंदळकर आणि ज्ञानदा रामतीर्थकर हे कलाकारही झळकणार आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत हे चार कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
आणखी वाचा – ‘शिवा’ मालिका फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, पार पडलं केळवण, लगीनघाईला सुरुवात
मालिकेच्या या प्रोमोमध्ये एकीकडे मृणास दुसानिस आणि विजय आंदळकर यांची झलक दिसते. या दोघांचं अरेंज मॅरेज ठरलेलं असतं मात्र, भटजी त्यांना तुमचं लग्न जमणार नाही असं हात पाहून सांगतो. यावर मृणाल विजयची समजूत काढताना दिसते. तर दुसरीकडे विवेक अन् ज्ञानदा यांच्या गप्पा सुरू असतात. यावेळी विवेक तिची चेष्टा करतो. दोघेही एकमेकांशी त्यांच्या लग्नाबद्दल बोलत असतात. मात्र त्यांचे लग्न मृणाल आणि विंजय यांच्या लग्नावर अवलंबून असल्याचे त्यांच्या संवादावरुन दिसून येते. मात्र इथेच येतो मलिकेचा मुख्य ट्विस्ट, तो म्हणजे हे चौघे एकत्र बोलत असताना लहान मुलांची ट्रेन आवाज करत येते. मागून गाडी येत आहे हे पाहताच विवेक मृणालला खेचतो, तर विजय ज्ञानदाला बाजूला करतो.
त्यामुळे आता या चौघांच्या प्रेमकहाणीची नेमकी गोष्ट काय? मालिकेचं कथानक कसं असणार? शिवाय पुढे जाऊन मालिकेत नेमके काय ट्विस्ट येणार ही लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मृणाल, ज्ञानदा, विवेक आणि विजय यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका १६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे