टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. सलमान खानच्या बिग बॉस या रिॲलिटी शोचा १८ वा सीझन गेल्या महिन्यात ६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा शो सुरू होण्याआधी या शोमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या नावांच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. या शोसाठी अनेक नावे पुढे आली होती, मात्र ही नावे या शोमध्ये दिसली नाहीत. त्यात धीरज धूपरपासून निया शर्मा आणि शोएब इब्राहिमपर्यंत अनेकांची नावे होती. पण निया व धीरज या दोघांची शोमध्ये सहभागी न होण्यामागची कारणे यापूर्वी समोर आली आहेत. अशातच आता शोएबनेही त्याच्या शोमधील त्याच्या सहभागी न होण्याचे कारण सांगितले आहे.
शोएबने इन्स्टाग्रामद्वारे बिग बॉस १८ या शोचा भाग नसल्याची माहिती दिली आहे. तसंच त्याने याद्वारे ‘बिग बॉस’कडेही बोट दाखवले आहे. शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांबरोबर प्रश्नोत्तरांचे सेशन केलं. यादरम्यान एका चाहत्याने त्याला विचारले की, “तो ‘बिग बॉस १८’ मध्ये का आला नाही?” तर अभिनेत्याने व्हिडीओद्वारे उत्तर दिले की, “मी ‘बिग बॉस १८’मध्ये सहभाग घेतला नाही कारण मला वैयक्तिकरित्या ते खूप वाटत आहे. कदाचित मी चुकीचा आहे. मला असे वाटते की, ‘बिग बॉस’ हा शो आता व्यक्तिमत्वासाठीचा शो राहिला नाही. आता तो कंटेंटवर आधारित शो बनला आहे. पूर्वी व्यक्तिमत्तवासाठीचे शो व्हायचे”.
आणखी वाचा – ‘शिवा’ मालिका फेम अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार, पार पडलं केळवण, लगीनघाईला सुरुवात
यापुढे त्याने असं म्हटलं की, “तुम्ही तुम्ही जितका कंटेंट द्याल तितके जास्त तुम्हीच दिसेल किंवा तुम्हाला दाखवले जाईल आणि तुम्ही पुढे जाल. यामुळे मी यात सहभागी झालो नाही आणि असं असलं तरी, मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी अद्याप स्वतःला हे पटवून देऊ शकलो नाही. आणि जर मला कधी वाटले की मी हे करु शकेन. जर मी स्वतःला पटवून दिले तर कदाचित मी ते शोमध्ये येईनही”.
तसंच पुढे अभिनेत्याने असं म्हटलं की, “शोमध्ये कधीकधी असे दिसते की आपण एखाद्याची खूप बाजू घेत आहोत किंवा एखाद्याला खूप कमीपणा देतो आहोत. किंवा काहीतरी इतर चालू आहे. पण या सगळ्यात वैयक्तिक व्यक्तिमत्व दिसत नाही असं मला वाटतं. कदाचित माझी चूक असेल”. दरम्यान, ‘बिग बॉस १८’ या यंदाच्या पर्वाची फारशी चर्चा होत नसल्याचे दिसून येत आहे. अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्या आणि नियम या सगळ्याचा परिणाम कुठे तरी या शोवर होतअसल्याचे दिसून येत आहे.