गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमामध्ये एका चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेक चाहते मंडळी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत आणि हा चित्रपट म्हणजे अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ द रुल’. येत्या ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रविवारी १७ नोव्हेंबरला चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पुष्पा 2 द रुल’चा ट्रेलर लाँच केला आहे. पाटणामध्ये ‘पुष्पा 2 द रुल’ चित्रपटाच्या भव्य ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Pushpa 2 Trailer)
अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या स्टाईलने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन पाहून थक्क व्हायला होत आहे. ‘पुष्पा २’ मध्ये दमदार डायलॉगही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ट्रेलरच्या सुरवातीला, ‘कौन है ये आदमी, जरूर इसे कोई गेहरी चोट लगी है’ असं म्हटलं जातं. ‘पुष्पा ढाई अक्षर…नाम छोटा है लेकिन साउंड बहोत बडा है, पुष्पा मतलब ब्रँड’ असं म्हणत पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुनची एन्ट्री होते.
पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा आणि हटके अंदाज दाखवण्यात आला आहे. तर ट्रेलरच्या शेवटी ‘पुष्पा १’मधील “फ्लॉवर नहीं फायर है…” या गाजलेल्या डायलॉगला घेऊन पुष्पा २ मध्ये आणखी एक नवीन डायलॉग लक्ष वेधून घेत आहे, तो म्हणजे – पुष्पा फायर नाही तर ‘वाईल्ड फायर’ आहे”. एकूणच एकाहून अधिक जबरदस्त डायलॉग, फाईट सीन्सची झलक या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
पुष्पाच्या फाईटसह त्याचा आणि रश्मीका मंदनाचा रोमान्सही पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यासाठी सर्वांना ५ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. ‘पुष्पा २ द रुल’चा २. ४८ सेकंदाचा ट्रेलर खरच वाईल्ड फायर आहे.