‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रियतेचं शिखर गाठणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच निरोप घेणार आहे. डिसेंबर २०१९मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचा प्रवास आता थांबणार आहे. साडे चार वर्षांहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यादरम्यान मालिकेत अनेक ट्विस्ट आले. काही ट्विस्टने टीआरपी वाढवला. पण काही ट्विस्ट प्रेक्षकांसाठी रटाळवाणे होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ‘आई कुठे काय करते मालिका बंद करा’, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटतं होत्या. (Madhurani Prabhulkar Emotional Video)
डिसेंबर महिन्यापासून ‘आई कुठे काय करते’ मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता हे मात्र निश्चित झालं आहे. त्यामुळे आता मालिकेचे निरोपाचे काही भाग दाखवले जाणार आहेत. मालिका संपत असल्यामुळे अनेक कलाकारांनी त्यांच्या भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अशातच आता अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने एक भावुक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधून तिने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओसह तिने असं म्हटलं आहे की, “स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने मला काय दिलं? थोडक्यात ‘आई’ने मला काय दिलं ही सांगायचं तर पाच वर्षांचा हा प्रवास सांगणे अवघड आहे. अगदी १७ वर्षांच्या तरुणांपासून ते ७० वर्षांच्या वृद्धांपर्यंत प्रत्येकाने मला काही ना काही दिलं. मला त्यांनी भेटून येऊन सांगितलं की मला तुमच्यात माझी आई दिसली. संपूर्ण महाराष्ट्राला या आईने खूप काही दिलं. पण मला आईने काही दिलं माहीत आहे… तुम्ही (प्रेक्षक)”
आणखी वाचा – ‘पुष्पा २’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “अरुंधती सगळ्यांची आई झाली पण माझी आणि या स्टार प्रवाह वाहिनीची आई तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात, आता शेवटचे काही भाग उरले आहेत. पण आपलं नातं कायमच बांधलं गेलं आहे. बघूयात निरोपाचे अंतिम भाग”. दरम्यान, स्टार प्रवाहवर काही नव्या मालिका सुरु होणार आहेत. त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत.