मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांचा असा स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मराठी सिनेसृष्टीमधील यांत मोडली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हणून सोनालीला विशेष ओळख मिळाली. अनेक चित्रपट, मालिकांमधून सोनालीने लोकप्रियता मिळवली. याशिवाय सोनाली तिच्या हटके फोटोशूटमुळेही विशेष चर्चेत असते. (Sonalee Kulkarni New Home)
सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला त्यानंतर ७ मे २०२१ रोजी दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहसोहळा उरकला. सोनाली व कुणाल यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्या दोघांनी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली. सोनालीचा पती कुणाल नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक आहे. सोनालीला भेटायला म्हणून तो भारतात येत असतो. तर सोनालीही परदेशात पतीबरोबर राहते. मात्र कामानिमित्त ती भारतात येऊन जाऊन असते.
अशातच दिवाळीनिमित्त सोनालीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळीनिमित्त सोनालीने नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दुबईत नवीन घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी सोनालीने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. दुबईतील नव्या आलिशान घरातील फोटो शेअर करत अभिनेत्रीने “पाडवा in the new होम” असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.
यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी सोनाली दुबईत पोहोचली आहे. सोनालीने दिवाळीसाठी खास पारंपरिक लूक करून फोटोशूट केलेलं पाहायला मिळतंय. परंतु, सोनालीच्या फोटोंपेक्षा तिने फोटोला दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या तिच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षांव केला आहे. शिवाय तिच्या लूकचंही भरभरून कौतुक केलं आहे. सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या नव्या घराची छोटीशी झलक पाहायला मिळाली. या तिच्या नव्या घराला सोनालीने पारंपरिक टच दिलेला पाहायला मिळाला.