एकीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद तर दुसरीकडे दिशा व राहुलच्या आयुष्यात नव्या आनंदाच्या बातमीने दार ठोठावलं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासह हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपं गायक राहुल वैद्य व अभिनेत्री दिशा परमार यांच्या घरी नुकतंच एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेतून अभिनेत्री दिशा परमार घराघरात पोहोचली. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतंच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गायक राहुल वैद्य याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं असल्याचं त्याने पोस्ट करत सांगितलं. (Rahul talk about new born baby girl name)
‘बिग बॉस हिंदी १४’ व्या पर्वातून घराघरात पोहोचलेला गायक राहुल वैद्य सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नुकतीच त्याने केलेली पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक छोटं गोंडस असं हत्तीचं पिल्लू दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने आपण बाबा झालो असल्याची बातमी चाहत्यांना दिली.
बाबा झाल्यानंतर राहुलने ‘हिंदुस्तान टाइम्स’ शी संवाद साधला. यावेळी राहुल म्हणाला, “मी ही भावना व्यक्त करू शकत नाही. आज मी या जगातील सर्वात नशीबवान माणूस आहे. गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर माझ्या घरी लक्ष्मी आली आहे. माझी मुलगी आणि दिशा दोघांचीही प्रकृती व्यवस्थित आहे. माझं संपूर्ण कुटुंब खूप आनंदात आहे”.राहुल पुढे सांगतो, “मला मुलगी झाल्याचं समजताच मी तीन-चार तास गप्प बसून होतो. मला काय झालं, ते कळतच नव्हतं. मी त्यावेळी सहा वेळा रडलो. आताही जेव्हा मी मुलीला पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू अनावर होतात. जेव्हा मी तिच्याशी बोलतो तेव्हा मला दाटून येतं. या आनंदाच्या क्षणी सर्वात पहिला फोन मला सोनू निगम यांनी केला. आमचा मुलगा बाबा झाला असं म्हणत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या”.
राहुलला मुलीच्या नावाविषयी विचारलं असता, अजूनपर्यंत नाव काय ठेवायचं, हे निश्चित झालेलं नाही. काही नावं शॉर्टलिस्ट केली आहेत पण राशीनुसारच नाव ठेवणार असल्याचं त्यांने सांगितलं.या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला. एका नेटकऱ्याने तुमच्या मुलीला खूप प्रेमा आणि आशीर्वाद असं लिहीलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने माशाल्लाह, तुमची मुलगी निरोगी राहो आणि आमचे खूप प्रेम लहान दिशाला, अशी कमेंट केली आहे. चाहत्यांसह त्यांच्या मित्रपरिवारानेही त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.