Poonam Pandey Death : बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अचानकपणे समोर आलेल्या या धक्कादायक बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे निधन झालं असल्याची माहिती सांगण्यात आली. या बातमीनंतर अनेकांनी पूनमला श्रद्धांजली वाहिली तर अनेकांनी तिचा मृत्यू न झाल्याचा दावा केला. दरम्यान अभिनेत्रीने स्वतःच जिवंत असल्याचा खुलासा केला. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत जनजागृती करण्याच्या हेतून हा स्टंट केला असल्याचं तिच्या व्हिडीओमधून दिसून आलं.
अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र चर्चा सुरु असताना तिचा मृत्यू न झाल्याचा अनेक कलाकारांनी दावा केला. हे विधान आता खरं ठरल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर येताच गायक राहुल वैद्यने पोस्ट शेअर करत अभिनेत्रीचा मृत्यू न झाल्याचं सांगितलं. राहुलने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन “पूनम पांडेचा मृत्यू झालेला नाही असे वाटणारी मी एकमेव व्यक्ती आहे का?” असं म्हटलं होतं.

अभिनेत्याचं हे विधान सत्यात उतरल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने जिवंत असल्याचा खुलासा करणारी एक पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. गायक राहुल वैद्यने पुन्हा इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “आणि मी बरोबर होतो. आता पूनम जिवंत आहे म्हणून मी आरआयपी पीआर, मार्केटिंग असे नक्कीच म्हणू शकतो. सनसनाटी, व्हायरल मोहीम तयार करण्याचा हा नवीन प्रयोग. कलियुगमध्ये आपले स्वागत आहे. पूनम पांडेचा मृत्यू झालेला नाही असे वाटणारी मी एकमेव व्यक्ती आहे का?” असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

पूनम शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटलं की, “मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की, मी इथेच आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयच्या मुखाचा कर्करोग मला झालेला नाही. पण या आजाराबाबत माहिती नसल्यामुळे आणि ज्ञानाच्या अभावामुळे आतापर्यंत हजारो महिलांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. इतर कर्करोगांप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो. या आजाराबाबत जनजागृती कशाप्रकारे करता येईल याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. या कर्करोगाचा अंत करण्यासाठी चला एकत्र येऊया”. पूनमचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे.