भारतीय संगीत क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे ‘मंगेशकर’ घराणं. मंगेशकर घराण्याने आपल्या रसिकांना गेली अनेक वर्ष मंत्रमुग्ध केलं आहे. याच ‘मंगेशकर’ कुटुंबियांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळणे, हे एका संगीत साधकासाठी मोलाचीच गोष्ट आणि ही कौतुकाची थाप मिळाली आहे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त यंदाच्या वर्षापासून ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कारा’ची सुरुवात करण्यात आली आणि यंदाचा हा पहिला पुरस्कार राहुल देशपांडे यांना मिळाला आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते राहुल देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Rahul Deshpande receive Lata Mangeshkar Sangeet Seva Award)
याबद्दल राहुल देशपांडेंनी भावना व्यक्त केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर हा पुरस्कार स्वीकारतानाचे काही खास क्षण शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ता म्हणून मी अत्यंत विनम्र आहे. पं. हृदयनाथ मंगेशकरजी, उषा ताई, आदिनाथ मंगेशकर, श्री. विश्वनाथ कराडजी, डॉ. धनंजय केळकरजी आणि माझ्या प्रिय पुणेकरांच्या उपस्थितीत हा सन्मान स्वीकारतानाचा अनुभव भारावणारा आहे. लता दीदींचा वारसा हा संगीताच्या परिवर्तनीय शक्तीचा पुरावा आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे”.
यापुढे राहुल देशपांडेंनी म्हटलं आहे की, “मंगेशकरांचे संगीत हे मानवजातीची सेवा करण्यासाठीचे समर्पण, कठोर परिश्रम, चिकाटी आणि जगावर किती प्रभाव पडतो याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. जर मी त्यांच्या कर्तृत्वाचा एक अंश देखील अनुकरण करू शकलो तर मी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असं मानेन. ‘सेवा’ ही संकल्पना माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक आहे आणि मला ठामपणे विश्वास आहे की, ही अदृश्य दैवी शक्ती आहे. जी मला संगीत आणि कला क्षेत्रातील सेवा करण्याच्या प्रवासात मार्गदर्शन करते. या उच्च हेतूसाठी मी फक्त एक पात्र आहे”.
आणखी वाचा – नवा शो मिळताच दीपिका कक्करकडून स्टाफची हकालपट्टी, अभिनेत्रीवर गंभीर आरोप, म्हणाली, “संधी मागितली पण…”
यापुढे राहुल देशपांडेंनी आभार व्यक्त करत म्हटलं आहे की, “मी हा पुरस्कार एक अनमोल आशीर्वाद मानतो आणि मी प्रार्थना करतो की, तो फक्त या आयुष्यभर माझ्याबरोबर कायम राहील. या अतुलनीय सन्मानाबद्दल मंगेशकर परिवार आणि दीनानाथ मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे पुन्हा एकदा आभार”. दरम्यान, या पुरस्कारानिमित्त गायक राहुल देशपांडे यांच्यावर सध्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.