छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे मुग्धा वैशंपायन. या शोमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मुग्धा विविध ठिकाणी तिच्या गाण्यांचे कार्यक्रम करते. याचे काही खास व्हिडीओही ती सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतीच मुग्धाने भारतीय शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून या अभ्यासक्रमात तिने मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे मुग्धावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुग्धाच्या या पदवी प्रदान सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच तिने आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओद्वारे तिने तिच्या या पदवी प्रदान सोहळ्याची खास झलक दाखवली आहे. मुग्धाला सुवर्ण पदक मिळताच तिच्यावर अनेक चाहत्यांसह, तिच्या कुटुंबियांनी व मित्रपरिवाराने कौतुकाचा वर्षाव केला होता. अशातच मुग्धाने नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओलाही चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्यासह तिचे आई-वडीलही पाहायला मिळत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला मुग्धा आपल्या वडिलांना “आपण कुठे जात आहोत?” असे विचारताच तिचे वडील “आपण मुंबई विद्यापीठात मुग्धाच्या पदवी प्रदान सोहळ्याला मुग्धाला मिळालेले सुवर्ण पदक आणायला जात आहोत” असं म्हणतात. यानंतर मुग्धा आई-वडीलांसह मुंबई विद्यापीठात आल्याचेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच यापुढे मुग्धाने मुंबई विद्यापीठाच्या आसपासचा परिसर दाखवला आहे आणि यानंतर मुग्धाचे पदवी व सुवर्ण पदक स्वीकारतानाचे काही खास क्षणही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक वेट्री दुराईसामी यांचे निधन, ९ दिवसांनंतर सापडला मृतदेह, हिमाचलमध्ये झाला होता अपघात
हा खास व्हिडीओ शेअर करत मुग्धाने “माझा पदवी प्रदान सोहळा असा पार पडला” असं म्हणत “तुम्हा सर्वांसाठी हा खास व्हिडीओ शेअर करत आहे” असंही म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुग्धाने तिच्या पदवी प्रदान सोहळ्याचे फोटो शेअर केले होते आणि तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे मुग्धाचे कौतुक केले होते. तसेच मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओवरही चाहत्यांनी कमेंट्सद्वारे पुन्हा एकदा अभिनंदन व कौतुक केले आहे.