दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाने त्याच्या गाण्यातून अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. गायक आज शरीररूपाने आपल्यात नसला तरी तो त्याच्या गाण्यांमधून चाहत्यांच्या मनात कायम आहे. सिद्धू मुसेवालाची काही गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यावर प्रचंड मोठा जनाक्रोष पाहायला मिळाला होता. त्यांचे अनेक चाहते आजही सिद्धू मुसेवालाच्या आठवणीत व्यथित होत असल्याचे पाहायला मिळते. अशातच आता गायकाच्या घरून एक आनंदवार्ता आली आहे.
काही दिवसांपूर्वी दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचे वृत्त आले होते. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर गर्भवती आहे आणि लवकरच त्यांच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील होणार आहे. अशातच आता त्यांच्या प्रकृतीबाबत एक नवीन बातमी समोर येत आहे.

सिद्धू मुसेवालाची ५८ वर्षीय आई चरण कौर यांना चंदीगडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘पंजाब केसरी’मध्ये चरण कौर जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे वृत्त आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील एकटे पडले आहेत. त्यामुळे त्यांनी आयव्हीएफ तंत्राद्वारे पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला आहे.
सिद्धू मूसवालाचे काका चमकौर सिंह यांनी चरण कौर यांच्या गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. यावेळी त्यांनी कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF)द्वारे नवीन सदस्य आणण्याविषयी सांगितले. तसेच काही सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धू मूसवालाची आई चरण कौर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत असे म्हटले जात आहे.
दरम्यान, सिद्धू मुसेवाला हा आपल्या आई-वडिलांचा एकलुता एक मुलगा होता. सिद्धूच्या पालकांनी या गरोदरपणाच्या वृत्तावर कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, कुटुंबीयांशी निगडीत असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर त्यांच्या बाळाला जन्म देणार आहेत.