Siddharth Jadhav Special Post : आपल्या आई वडिलांना सर्व सुख मिळावं, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आई वडिलांना फिरायला घेऊन जावं, किंवा त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवता यावा यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कऱण्यात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिद्धू मागे राहिलेला नाही. सिद्धार्थचं त्याच्या आई वडिलांवर विशेष प्रेम आहे, हे त्याच्या सोशल मीडियावरील फोटोंवरून कळून येत. सिद्धार्थ सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो, नेहमीच तो काही ना काही खास पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच सिद्धूने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सिद्धार्थने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केलेली पोस्ट अधिक खास आहे. कारण या पोस्टमध्ये सिद्धार्थ नसून त्याचे आई बाबा पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्टखाली त्याने लिहिलेलं कॅप्शन अधिक लक्षवेधी आहे. “हाच तो क्षण. आई बाबांचा पहिला परदेश दौरा. माझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे, हे मी शब्दात सांगू शकत नाही. त्यांच्या आशीर्वादाने मी जग बघायला फिरलो आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने मी त्यांना जग बघायला पाठवतोय. त्यातला आज त्यांचा हा ‘पहिला प्रवास'”.
“माझ्या शाळेतल्या पहिल्या सहली पासून ते आतापर्यंत लंडनला शूटला जाईपर्यंत जो आनंद त्यांना असायचा तसाच किंवा त्यापेक्षा जास्त आनंद आज मला वाटतोय. ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय. तुम्ही मज्जा करा. माझी काळजी नको. मी आहे तुमच्यासोबत” असं म्हणत सिद्धार्थने आई वडिलांच्या आनंदासाठी ही केलेली गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याच कौतुक केलं आहे. तर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.
आजवर सिद्धार्थने मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा डंका गाजवला. विनोदी अभिनेता म्हणून सिद्धार्थ ओळखला जात असला तरी त्याच्या गंभीर भूमिकेलाही त्याने तितकाच न्याय मिळवून दिला आहे. प्रत्येक भूमिका आजवर सिद्धार्थने ताकदीने केली आणि सिनेरसिकांच्या मनात घर केलं. आज सिद्दार्थने आई वडिलांसाठी केलेली ही खास गोष्ट पाहून अनेकांच्या मनात त्याच्या बद्दलचा आदर वाढला आहे.