सध्या सिनेसृष्टीत वेगवेगळ्या चित्रपटांची चलती असलेली पाहायला मिळतेय. सोबत कलाकार मंडळी आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचावा म्हणून प्रमोशन करण्यातही व्यस्त आहेत. ऐतिहासिक, कॉमेडी चित्रपट हे एकामागोमाग येत गेले मात्र यांत ऍक्शनपटाची कुठे तरी कमतरता पाहायला मिळाली. फॅमिली ड्रामा म्हणा वा ऐतिहासिक सिनेमे येत असताना प्रेक्षक ऍक्शनपट चित्रपटांना कुठेतरी मिस करत असल्याचं समोर आलं. आता ऍक्शनपट चित्रपटाची ही कमतरता भरून काढण्यासाठी एक बिग बजेट व सुप्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी असलेला ‘अंकुश’ हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. (Ankush Movie New Poster)
काही दिवसांपासून ‘अंकुश’ या चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येत होते. अशातच आता चित्रपटातील पहिलं वहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. धमाकेदार ऍक्शनचा भरणा या चित्रपटात असणार असल्याचं पोस्टरवरून कळतंय. या पोस्टरवर नवोदित अभिनेता दीपराज घुले व अभिनेत्री केतकी माटेगांवकर यांचा भडकता लूक पाहायला मिळतोय. तसेच चित्रपट पूर्ण होण्यासाठी साथ लाभलेल्या अनुभवी कलाकारांचा लूकही या पोस्टरवर पाहायला मिळाला आहे. या पोस्टरवर ऋतुजा बागवे, मंगेश देसाई, सयाजी शिंदे, चिन्मय उदगीरकर या कलाकरांना पाहणं रंजक ठरतंय.
या चित्रपटात ऍक्शन, रोमान्स व कौटुंबिक साथ असलेलं कथानक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात दीपराज घुले हा मुख्य भूमिकेत दिसणार असून या नवोदित कलाकाराने उत्तम भूमिका साकारली आहे, हे त्याच्या पोस्टरवरून समोर आलं आहे. अभिनेत्री केतकी माटेगावकर या चित्रपटात दीपराजसोबत झळकणार आहे. केतकी आणि दीपराज यांना चित्रपटात एकत्र पाहणं रंजक ठरणार आहे.
हे देखील वाचा – सिद्धार्थ जाधवने आई बाबांना पहिल्यांदाच परदेशात फिरायला पाठवलं अन्…; भावुक होत म्हणाला, “ते मला नेहमी सांगायचे…”
या चित्रपटात अभिनेत्री केतकी माटेगावकर, ऋजुता बागवे, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर, गौरव मोरे, नागेश भोसले, दीपराज घुले आदी कलाकार मंडळी दिसणार आहेत.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/08/ankush-3-1024x546.jpg)
‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत ‘अंकुश’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी सांभाळली असून चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक निशांत धापसे यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा ही नामदेव मुरकुटे यांची आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होणार आहे.