कलाकार मंडळींचं खासगी आयुष्य जाणून घेण्यास चाहत्यांना अधिक रस असतो. काही कलाकार मंडळी आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलणं टाळतात. तर काही आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी चाहत्यांबरोबर शेअर करतात. त्यापैकीच एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टींबाबत व्यक्त होतान दिसतो. नुकतंच त्याने सगळ्यांना एक आनंदाची बातमी दिली. त्याची आई व अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी लग्न केलं असल्याचं सिद्धार्थने सांगितलं.
सिद्धार्थने आईचा लग्नाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. तसेच “मी तुझ्या पाठिशी कायमच उभा आहे. आता तू फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर” असं सिद्धार्थने म्हटलं. त्याचबरोबरीने आईला त्याने नव्या आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आता सीमा यांच्या लग्नाच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आणखी वाचा – आधी ब्रेकअप आता बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर शिव ठाकरेचं अफेअर?, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणतो, “आताच माझं…”
मितालीनेही सासूबाईंच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये सीमा चांदेकर यांचा पारंपरिक लूक पाहायला मिळत आहे. साडी, हातात हुरवा चुडा, हातावर मेहंदी असा सीमा यांचा लूक आहे. तर त्यांचे पती नितीन यांनी सूट परिधान केला असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
सासूबाईंच्या लग्नामध्ये मितालीच्या लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिने मराठमोळा लूक केला होता. साडी, गळ्यात मंगळसुत्र, नाकात नथ असा मितालीचा लूक लक्षवेधी ठरला. तर सिद्धार्थही सूटमध्ये अगदी सुंदर दिसत होता. मितालीनेही तिच्या सासूबाईंना सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.