अभिनेत्री हेमांगी कवी ही तिच्या अभिनयाशिवाय स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. हेमांगीने आजवर रंगभूमी, चित्रपट व मालिका या तीनही माध्यमांतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. हेमांगी मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदी सिनेविश्वातही सक्रिय आहे. सध्या हेमांगी ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीला तिच्या अभिनयाच्या कौतुकाच्या मिळालेल्या पोचपावतीचा अनुभव तिने तिच्या पोस्टमधून सांगितला आहे. (Hemangi Kavi Special Post)
हेमांगी कवी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बरेचदा हेमांगी सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना दिसते. तर काहीवेळा अभिनेत्री तिने शेअर केल्या व्हिडीओ वा फोटोंमुळे ट्रोलही होताना दिसते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेमांगीला नुकत्याच झालेल्या ‘झी रिश्ते अवॉर्ड्स २०२४’मध्ये सर्वोत्कृष्ट आई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या व्हिडीओत हेमांगी पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर येत भावना व्यक्त करताना दिसत आहे. हिंदी पुरस्कार सोहळ्यात हेमांगी अभिमानानं आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत बोलली. मी मराठीतच बोलणार असं म्हणत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या.
हा पुरस्कार घेतानाचा व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. याखाली कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “काल मातृभाषदिन होता आणि कालच मला ‘झी रिश्ते अवॅार्डस् २०२४’मध्ये माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेतल्या भवानी चिटणीस या व्यक्तीरेखेसाठी सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार मिळाला. माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच होता. रंगमंच्यावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत माझ्या भावना व्यक्त कराव्या कारण समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली”.
पुढे ती म्हणाली, “ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले आणि जेव्हा समोरुन ‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं तेव्हा तर उर भरुन आला, बळ मिळालं. त्यानंतर ज्या प्रकारे स्टेजवरील उपस्थितांनी मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहाहा खूपच भारी वाटलं. रंगमंचावरुन खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं. आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो. आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतं आहे”, असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलेलं पाहायला मिळत आहे.