मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. नाटक, चित्रपट व मालिका अशा तीनही माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. पती मोहन गोखले यांच्या निधनानंतर त्यांनी आई व बाबा अशा दोन्ही भूमिका लीलया पेलत लेक सखी हिचा सांभाळ केला. शुभांगी गोखले व सखी गोखले या दोन्ही मायलेकी त्यांच्या नात्याविषयी आणि मोहन गोखलेंच्या आठवणींविषयी अनेकदा त्यांच्या भावना व्यक्त करत असतात.
अशातच शुभांगी गोखले यांनी नुकत्याच एका मुलाखतीत पती मोहन गोखलेंच्या आठवणीत एक किस्सा शेअर केला आहे. शुभांगी यांनी नुकतीच ‘असोवा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी शुभांगी गोखले यांना “त्या २५ वर्षांच्या शुभांगी गोखलेला आता काय सांगावंस वाटेल? किंवा तेव्हा एखादी गोष्ट बदलायला पाहिजे असं वाटतं?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत शुभांगी यांनी “मोहन गोखलेंच्या व्यसनाला तेव्हा रोखता आलं असतं” असं म्हटलं आहे.
यावेळी शुभांगी यांनी उत्तर देत असं म्हटलं की, “मला असं वाटतं की, तेव्हाच्या राणीला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. खूप मौल्यवान आणि सांभाळायला अवघड असणारा असा माणूस तिच्या आयुष्यात होता. तेव्हा मी वयाने लहान होते. त्यामुळे तेव्हा काही गोष्टींचा मला संघर्ष कसा करावा? हे माहीत नव्हतं आणि ते नंतर कळलं. तसंच वयाने लहान असल्याने व तेव्हा मला बायकांना काही गोष्टी rule करता येतात हे माहिती नव्हतं.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी खूप घाबरून राहिले किंवा मी त्याच्या (मोहन गोखलेंच्या) अजून मागे लागायला हवं होतं की, त्याचं व्यसन त्याच्या तब्येतीसाठी घातक आहे. मोहन गोखले माणूस सांभाळायला खूपच कठीण होता. पण काहीतरी धाक किंवा अपेक्षा दाखवून मोहनची व्यसनमुक्ती करता आली असती. पण मी तेव्हा घाबरून राहिले आणि मला तेव्हा काही गोष्टींचा अंदाज नव्हता. माझंही त्याच्यावर प्रेम होतं, त्यामुळे त्याला बरं वाटावं असं मी करत गेले.”
दरम्यान, अभिनेत्री शुभांगी गोखले या गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी आजवर अनेक हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘काहे दिया परदेस’सारख्या अनेक मालिका गाजल्या. सध्या त्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.