अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला होता. हे बातमी ऐकताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चित्रपटाच्या शुटिंगनंतर तो घरी आला आणि त्यानंतर ही घटना घडल्याचं सांगितलं जात होतं. त्याच रात्री त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेत्याच्या प्रकृती स्थिर असल्याचं समोर येत आहे. श्रेयसला घरी कधी सोडणार याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. श्रेयसचा मित्र व निर्माता सोहम शाह याने याबाबत नुकताच खुलासा केला. (Shreyas talpade when discharged from hospital)
सोहम याने ‘इटाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं की, “श्रेयसला रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्याला ज्या रात्री रुग्णालयात नेण्यात आलं होतं त्या रात्री मी त्याला भेटायला गेलो होतो. आणि आजही मी त्याला भेटून आलो आहे. त्याच्या तब्येतीत बराच सुधार आहे. श्रेयसला हसताना आणि माझ्याशी बोलताना पाहून मला खूप मोठा दिलासा मिळाला. ही आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे”.
पुढे सोहम त्याच्या पत्नीचं दिप्तीबाबत बोलताना म्हणाला, “मी त्यांच्या पत्नीचे दीप्तीचेही खूप आभार मानू इच्छितो की अगदी खंबीर मनाने या सगळ्यात उभी राहिली आणि तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच रुग्णालयात नेण्याचा निर्णय खूप महत्त्वाचा होता. या सगळ्या परिस्थितीत दिप्ती खंबीर राहिली हेच खूप मोठं आहे”, असं सांगत त्याने दिप्तीची तेव्हाची परिस्थिती व श्रेयसच्या आताच्या तब्येतीबाबत सांगितलं.
श्रेयसचं हृदय दहा मिनीटांसाठी थांबलं होतं. यागोष्टीची माहिती अभिनेता बॉबी देओलने दिली होती. त्याने ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना त्याने याबाबत सांगितलं होतं. बॉबी म्हणाला, “मी श्रेयसच्या बायकोशी बोललो. तो खूप चिंतेत होती. त्याचं हृदय जवळजवळ १० मिनीटांसाठी थांबलं होतं. त्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्याच्यावरचा धोका टळला. आता सगळ्यांनी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे”, असं बॉबी म्हणाला होता.