Viral Video : ‘प्रेमाला वय नसतं’ हा एक प्रचलित मराठी वाक्यप्रचार आहे, ज्याचा अर्थ असा आहे की प्रेम हे कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतं. वयामुळे प्रेमावर कोणताही परिणाम होत नाही. कोणत्याही दोन व्यक्तींना एकमेकांबद्दल प्रेम वाटू शकते, मग त्यांचे वय काहीही असो. हे प्रेम शारीरिक किंवा भावनिक असू शकते. अनेकदा, लोक त्यांच्या जोडीदाराच्या वयामुळे किंवा समाजाच्या दबावामुळे प्रेम व्यक्त करण्यास किंवा स्वीकारण्यास कचरतात, पण काहीवेळा ते विविध मार्गाने आपलं प्रेम सिद्ध करतात. सोशल मीडियावर तर आता अनेक ट्रेंडिंग रीलमध्ये प्रेमाला वयोमर्यादा नसते हे व्हिडीओ व्हायरल होतात.
अशातच सध्या सोशल मीडियावर एक वयोवृद्ध जोडप्याचा सुंदर, मन हेलवणारा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यांत प्रेमाबरोबरच माणुसकीनेही प्रत्येकाचं मन जिंकलं आहे. देव कोणाच्या रुपात कधी आपल्यासमोर येईल हे सांगता येत नाही. हो अगदी असंच काहीस झालं आहे या व्हिडीओमध्ये. ९३ वर्षीय आजोबा त्यांच्या पत्नीला दागिना करायला म्हणून गावाकडून शहराकडे आले आणि एका सोनाराच्या दुकानात शिरले. जोडीला पत्नीही होती.
त्यांना पाहून थेट मालकच त्यांच्यासमोर येतो. यावेळी ते आजोबा त्यांच्या बायकोसाठी माळ घ्यायची आहे असं सांगतात. यावर दुकानदार त्यांना म्हणतो, “बाबा पैसे किती आणले?”. तेव्हा ते आजोबा अकराशे रुपये आणि काही सुट्टे पैसे त्या मालकाच्या हातात टेकवतात. त्यानंतर दुकानदार आजोबांची विचारपूस करताना दिसत आहे, आणि त्यांच्या पत्नीला आवडलेला हार बघताना दिसत आहे. मात्र त्यानंतर त्या दुकानदाराने असे काही केले ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुकानदाराने आजोबांनी दिलेले सर्व पैसे त्या माऊलीच्या हातात दिले आणि ते दागीने त्यांना असेच देऊ केले. यावर ते आजोबा पैसे घेण्यासाठी दुकानदाराला आग्रह करताना दिसत आहेत. मात्र दुकानदार “पांडुरंगाचा आणि तुमचा आशिर्वाद सगळं कल्याणच कल्याण आहे”, असं म्हणत त्यांच्याकडील दहा दहा रुपयाच्या दोन नोटा घेतो आणि हे पैसे कायम जपून ठेवेन असं म्हणतो.
दुकानदाराच्या याच कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे. एकीकडे बायकोच स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाताशी असलेली तोडकी मोडकी रक्कम घेऊन येणारे ते आजोबा आणि एकीकडे माणुसकी दाखवत कोणतीही रक्कम न घेता त्या आजोबांचं आणि त्यांच्या पत्नीचं स्वप्न पूर्ण करणारा तो सोनार. हो. दोघांचं करावं तेवढं कौतुक कमीच. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.





