टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘सीआयडी’मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे आज मंगळवार (५ डिसेंबर) रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. शरीरातील बरेचसे अवयव निकामी झाल्याने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील तुंगा रुग्णालयात ते उपचार घेत होते. काल रात्री त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं. दिनेश यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. यावर मराठीतील अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अशातच ‘सीआयडी’मधील प्रद्यूम्न अर्थात अभिनेते शिवाजी साटम यांनी दिनेश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्यांनी दिनेश फडणीस यांच्या फोटोचा कोलाज करत त्याखाली “दिनेश फडणीस, साधा, नम्र, प्रेमळ.” असं लिहिलं आहे. (CID Arist Shared Post For Dinesh Phadnis)
या शोमधील डॉ. तारिकाची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा मुसलेनेही दिनेश यांच्या निधनाची बातमी कळताच शोक व्यक्त केला आहे. श्रद्धाने “फ्रेडी सर तुम्ही कायम स्मरणात राहाल” असं म्हणत त्यांच्याबरोबरचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. तर सहा वर्ष या शोमध्ये इन्स्पेक्टर विवेकची भूमिका साकारणाऱ्या विवेक मश्रूने दिनेश यांच्याबरोबरच्या काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्याने त्यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला असून त्याखाली “तुमची आठवण येत आहे” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – Dinesh Phadnis Passes Away : ‘सीआयडी’ फेम फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचं निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
अभिनेत्री तान्या अब्रोलनेही इन्स्टाग्रामवर दिनेश यांच्याबरोबरच्या काही प्रेमळ आठवणी शेअर केल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत “प्रिय दिनेश सर किंवा आम्ही सर्वजण त्यांना प्रेमाने आणि आपुलकीने ‘फ्रेडी सर’ म्हणतो. ज्या व्यक्तीने अनेकांना ऑनस्क्रीन व वास्तविक जीवनात खूप हसवलं आणि आता तुम्ही आमच्यातून गेलात. आम्ही फक्त तुमचे किस्से आठवूनच हसायचो. पण आता तुमच्या आठवणीत रडत आहोत. तुमच्या आत्म्याला शांती मिळो. फक्त आम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबाला व चाहत्यांनादेखील तुमची कायम आठवण येत राहील. तुम्ही मला दिलेले ‘बैदा’ हे नाव मला कायम आवडेल. तुम्हाला कधीच विसरता येणार नाही. ओम शांती.” असं म्हटलं आहे.
दरम्यान, दिनेश यांच्या अकाली जाण्याने सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अचानक जाण्याच्या वृत्ताने सर्वांनाच दु:ख झाले असून सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांच्याबरोबरचे काही खास क्षण शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.