झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेतील ‘श्री’ या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्याच्या श्री या पात्राने त्याला सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. शशांकने मराठी रंगभूमीसह रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तसेच तो आता छोट्या पडद्यावरील मालिकांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
अभिनेता सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो कायमच चर्चेत राहत असतो. अशातच त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता नुकताच त्याच्या गावी पुण्याला गेला होता. यावेळचे काही खास क्षण त्याने या व्हिडीओद्वारे सांगितली आहे. त्याचबरोबर त्याने या व्हिडीओमध्ये त्याच्या लहानपणीच्या आवडीच्या पदार्थाची आठवणही सांगितली आहे.
शशांकने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “काल खूप महिन्यांनी पुण्याला घरी गेलो होतो. अगदी लहानपणापासून आवडीचा पदार्थ म्हणजे, सालपापडी. आईकडे किंवा आजीकडे कधी याची मागणी केली की, त्या नेहमी उन्हाळ्यात करेन असं म्हणायच्या आणि अखेर काल तो योग आला. मी, प्रियांका आणि ऋग्वेद येतोय म्हटल्यावर आईने ३ दिवस आधी तांदूळ भिजवले आणि आमच्यासाठी सालपापड्या केल्या”.
यापुढे शशांकने त्याच्या कुटुंबियांचा उल्लेख करत “आम्ही सगळ्यांनी मिळून अक्षरशः एका बैठकीत सगळं पीठ संपवल” असं म्हणत त्याने “तुम्हाला आवडते का सालपापडी? तुम्ही काय म्हणता? सालपापडी की फेण्या? की आणखी काही?” असा प्रश्नही चाहत्यांना विचारला आहेआणि त्याच्या या प्रश्नाला चाहत्यांनी उत्तरेदेखील दिली आहेत. दरम्यान, शशांकच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी “सातारामध्ये याला साळपापडी म्हणतात, आमच्याकडे याला सांडई म्हणतात, आम्ही तांदूळ पापडी म्हणतो, आम्हीसुद्धा याला सालपापडीच म्हणतो आणि मला सालपापडी खूप आवडतात” अशा अनेक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.