police van number plate issue : बरीचशी कलाकार मंडळी आहे जी सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसतात. समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर वा न पटलेल्या गोष्टींवर ते सडेतोडपणे आवाज उठवतात. सोशल मीडियावर या कलाकार मंडळीचा वावर बऱ्यापैकी पाहायला मिळतो. यापैकीच एक म्हणजे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर. शशांकने आजवर अनेकदा राजकीय, सामाजिक मुद्द्यांवरुन प्रश्न उपस्थित करत व्हिडीओ शेअर केले आहेत आणि शशांकच्या या व्हिडीओला अनेकदा चाहत्यांनीही पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळाला. शशांकने रस्त्यावरील कचरा, त्यामुळे होणारी दुर्गंधी, त्यामुळे होणारा त्रास तसेच वाहतुकीचे मोडलेले नियम याबाबत अनेकदा सडेतोडपणे भाष्य केलं आहे. आणि प्रशासनाने याची दखलही घेतली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा शशांक एका विशिष्ट मुद्द्यामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. शशांकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हा मुद्दा साऱ्यांच्या लक्षात आणून दिला आहे. शशांकने पोलिसांच्या व्हॅनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – “काही जखमा कधीच भरुन निघत नाही”, वडिलांच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, “जवळच्या व्यक्तीला गमावलं…”
या व्हिडीओसह त्याने काही प्रश्न विचारले आहेत. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शशांक असं म्हणतो, “आरटीओचे नियम हे सगळ्यांना सारखेच असतात आणि न्यायदेवतेपुढे कोणीही लहान-मोठे नसतं, हे गृहीत धरुन मी हा व्हिडीओ शूट करत आहे. आता ही ऑन ड्युटी पोलिस व्हॅन, यावर नंबरप्लेट दिसत नाही. उजवीकडे, डावीकडे, वर-खाली कुठेच नंबरप्लेट नाही. बिचारी मोडकळीला आलेली ही गाडी आपले पोलिस बांधव चालवत आहेत. पण नंबरप्लेट काही दिसत नाही”.
पुढे तो म्हणतो, “उजवीकडे नंबरप्लेट आहे. पण दुर्दैवाने गंजलेली नंबरप्लेट आहे. आपल्या गाड्यांच्या नंबरप्लेट जर अशा असतील किंवा फॅन्सी असतील, खरंतर त्या असूच नयेत. मी अगदीच त्याविरोधात आहे. पण अशा गंजलेल्या नंबरप्लेट आपल्या असतील तर त्याला चलान लागतं, ज्याचे आपल्याला पैसे भरावे लागतात. माझा प्रश्न हा आहे, या ऑन ड्युटी व्हॅन्सनासुद्धा चलान लागतं का? यांना कोर्ट किंवा ऑनलाइन चलान भरावं लागत का?”.
व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत त्याने असं लिहिलं आहे की, “माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून विचारतोय, शासकीय गाड्यांना, पोलीस व्हॅन्स ना चलान लागतं का? आणि लागलं तर ते भरलं जातं का? त्यांनी सिग्नल मोडला तर चालतं का? माननीय गडकरी साहेबांच्याच गाडीला एकदा चलान भरावं लागल्याचं मी ऐकलं आहे पण सरसकट सगळ्या नियम मोडणाऱ्या सरकारी गाड्यांना चलान लागतं का? जे पोलिस बांधव रस्त्यावर On duty आहेत त्यांच्याच गाडीची ही अवस्था? हे सगळं कुतूहल म्हणून विचारतोय. गैरसमज नसावा. गंमत ही आहे की आपल्याकडे पोलिसांची भीती घातली जाते त्यामुळे जरा जपूनच व्यक्त होतोय. नाईलाज आहे”. शशांकच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही प्रश्नार्थक कमेंट्स केल्या आहेत.





