‘पावनखिंड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शेर शिवराज’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावर आधारित असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर आता भविष्यातही शिवकालीन चित्रपट येणार का याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. (Shantanu moghe in Ravrambha)
====
हे देखील वाचा- “दोन विनोदवीरांची मालवणीत जुगलबंदी” महेश मांजरेकर करणार निर्मिती
====
महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या चित्रपटांतून मांडण्यात येत आहेत. आणि मराठीतील अनेक गुणी कलावंतांनी शिवरायांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली. आता आगामी ‘रावरंभा’ या मराठी चित्रपटातून शंतनू मोघे छत्रपतींच्या व्यक्तिरेखेतून आपल्या समोर येण्यास सज्ज झाला आहे. शिवजयंतीचे औचित्य साधत ‘रावरंभा’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे. याबाबतचा अनुभव शेअर करत शंतनू मोघे असे म्हणाला की, ‘मी छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठया पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद खूप आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्द्दल बोलताना तो पुढे असे म्हणाला की, ‘रावरंभा’ हा अतिशय भव्यदिव्य व थक्क करणारा चित्रपट आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, ‘रावरंभा’ चित्रपटात ‘मला शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळतेय. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते.(Shantanu moghe in Ravrambha)
‘रावरंभा’ चित्रपटात शंतनू मोघेला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. तर शंतनूसोबत चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. येत्या ७ एप्रिलला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे.