बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या ५८व्या वाढदिवशी डबल गिफ्ट दिलं आहे. मध्यरात्री त्याचा ब्लॉकबस्टर ‘जवान’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. आता यात भर म्हणून अभिनेत्याने नुकतंच त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाचं पहिलं टीझर चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होताच चाहते व नेटकरी प्रचंड आनंदित झाले. दरम्यान, या पहिल्या टीझरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नसली, तरी चाहते याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. (Shahrukh Khan Dunki first teaser Out)
राजकुमार हिरानी यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. ज्यामध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘३ इडियट्स’, ‘पीके’ यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे. आता बऱ्याच काळानंतर ते दिग्दर्शन क्षेत्रात परतणार आहे. चित्रपटाच्या या टीझरमध्ये शाहरुख एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळतो. त्याचबरोबर अभिनेता विकी कौशलची एन्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – “माझ्या हजारो चुका…”, ‘आई कुठे…’ फेम अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाली, “सगळंच संपलं…”
२ मिनिटांच्या या टीझरमध्ये आपल्याला चार मित्रांची कहाणी पाहायला मिळत आहे. टीझरची सुरुवात शाहरुख त्याच्या मित्रांसह दूर जाताना होत आहे. त्यानंतर शाहरुख व त्याच्या चार मित्रांची ओळख या टीझरमध्ये होताना दिसते. टीझरमध्ये हे चार मित्र लंडन जाण्याची स्वप्न पाहतात. या मित्रांमध्ये नेमकी काय धमाल होते, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा असून शाहरुख यात वेगळ्या अंदाजात दिसत आहे. शाहरुखसह यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल, अनिल ग्रोव्हर, विक्रम कोचर, बोमन इराणी आणि मराठमोळी अभिनेत्री ज्योती सुभाष आदी कलाकार प्रमुख भूमिकेत असतील.
हे देखील वाचा – बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट अखेर ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येणार ? जाणून घ्या
शाहरुखने नुकतंच इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पहिलं टीझर शेअर केलं. ज्यामध्ये तो म्हणाला, “आपले स्वप्न व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामान्य आणि खऱ्या व्यक्तींची ही गोष्ट आहे. मैत्री, प्रेम आणि घर नावाच्या नात्यात राहण्याची एक हृदयस्पर्शी गोष्ट. या प्रवासाचा एक भाग बनणे ही एक सन्मानाची बाब असून आपण सगळे यात सामील होणार, अशी मला अशा आहे.” चित्रपटाचा हा टीझर समोर येताच चाहते व नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला. तसेच, यावेळी अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील कमेंट्समधून देण्यात आल्या.