बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने २०२३ मध्ये ‘पठाण’ व ‘जवान’ यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. जागतिक बॉक्स ऑफिसवर एकत्रितपणे २१०० कोटी रुपयांची कमाई या चित्रपटांनी केली. या मेगास्टारने केलेलं हे सगळ्यांत मोठं पुनरागमन होतं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यांनतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’ या चित्रपटाची. या वर्षाच्या शेवटी व ‘ख्रिसमस’च्या विकेंडला पडद्यावर येणार्या अत्यंत अपेक्षित असलेला ‘डंकी’ धमाका करणार एवढं मात्र नक्की. (Dunki VS Salaar)
तर या वर्षाच्या शेवटी म्हणजेच २१ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान स्टारर ‘डंकी’ या चित्रपटाशी आणखी एका चित्रपटाची स्पर्धा होणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘सालार’. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ‘सालार’ चित्रपटाची जोरदार हवा असलेली पाहायला मिळत आहे. ‘सालार’ हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे की, ‘सालार’ व ‘केजीएफ’ची कथा एकमेकांशी संबंधित असेल. ‘सालार’चे दिग्दर्शन ‘केजीएफ’चे प्रशांत नील यांनी केले आहे.
तथापि, यंदाचा ख्रिसमस हा आनंददायी ठरणार आहे. प्रभास स्टारर ‘सालार’, व ‘शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला व यंदाच्या वर्षाच्या वीकेंडला प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणार आहे. बॉक्स ऑफिसवर १०० टक्के यशाचे प्रमाण असलेले राजकुमार हिरानी व प्रशांत नील या दोन चित्रपट निर्मात्यांसह जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या दोन दर्जेदार स्टारची टक्कर बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे.
दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर एकत्र आलेली एंट्री हे चित्रपट पाहणाऱ्यांसाठी निःसंशयपणे दुहेरी ट्रीट असली तरी, वितरक व प्रदर्शकांसाठी हा चिंतेचा विषय ठरणार आहे. कारण स्क्रीनसाठी, बराच संघर्ष होणार आहे. दोन्ही चित्रपट हे बिग बजेट चित्रपट असून मेट्रो शहरांच्या मल्टिप्लेक्समध्ये गोंधळ निर्माण करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.