‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर परांजपे. समीरची मालिकेतील अभिमन्यू ही भूमिका विशेष गाजली. समीर कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. समीरने त्याच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकली. या कार्यक्रमामुळेही समीरचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला. अशातच काल समीर या स्पर्धेतून बाहेर झाला असल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Sameer Paranjape Eliminated)
समीरच्या आवाजाचे चाहते असणाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु पाहायला मिळत आहे. अभिनेता समीर परांजपेने ‘सूर नवा ध्यास नवा’मधील आतापर्यंतच्या प्रवासाचे काही फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. “आयुष्यात एखादी प्रिय गोष्ट काही कारणांनी करायची राहून गेली की ती राहूनच जाते म्हणतात आणि फक्त दिवसेंदिवस आपल्यातलं, त्या गोष्टीतलं अंतर वाढत राहतं. आपण असहाय्यपणे फक्त बघत राहतो. हळहळत राहतो. ‘कट्ट्यावर वासरात लंगडी गाय शहाणी’ या म्हणीप्रमाणे २-४ मित्रांच्या टोळक्यात आपल्या गुरूने दिलेल्या शिदोरीवर पोसलेल्या कलेची चमक दाखवून वाह वाह मिळवत राहतो आणि अरे लेका तू हे सिरिअसली करायला हवं होतंस नाव काढलं असतंस हे ऐकून उगाचंच खूश होत राहतो. हे सगळं मी ही अनुभवलं आहे. मी ही तेच केलं. हावरटा सारखं गाणं जगून घेतलं”.
पुढे अभिनेत्री रसिका सुनीलविषयी अभिनेत्याने लिहिलं, “रसिका सुनील तूही ‘सूर नवा…’चा प्रवास माझ्यासारखाच जगत आहेस. बोल्ड, बिनधास्त, ब्युटीफुल आणि उत्तम अभिनेत्रीमागची हळवी कलाकार मला कळली. खूप भावली. आपली मैत्री इथून सुरू झाली आहे ती अशीच राहील याची खात्री आहे. माझ्या सगळ्या स्पर्धक मित्रांनो तुमच्याकडून ही खूप गोष्टी शिकलो. तुम्ही सगळे कमाल आहात. गाते रहो” असं तो म्हणाला.
यापुढे परीक्षकांसाठी पोस्ट लिहित अभिनेता म्हणाला, “मला कळलं कुठल्याही गाण्यातला भाव तुम्ही इतक्या ताकदीने पेश कसं करू शकता. तुमचं ‘माणूसपण’ तुमच्या प्रत्येक गाण्यात उतरतं बहुदा. परीक्षक म्हणून तुम्ही दिलेल्या कमेंट्समधून तर शिकलोच पण माणूस म्हणून ही खूप काही शिकवलंत. खूप प्रेम. माझा वनवास संपवलात यासाठी कायम ऋणात राहीन” असं म्हणत त्यांचे आभार मानले.