सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये लग्नसराईचे वारे वाहत आहेत. मराठी सिनेसृष्टीत प्रसाद-अमृता, सुरुची-पियुष यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. नुकतीच मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे हीदेखील सूर्या कुमारबरोबर विवाहबंधनात अडकली. तसेच मुग्धा व प्रथमेश हे दोघेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच बॉलिवूडमधील एक जोडीच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री मुक्ती मोहन विवाहबंधनात अडकली. काल (१० डिसेंबर) रोजी मुक्तीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. (Mukti Mohan On Instagram)
सध्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. ‘अॅनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. याच चित्रपटातील अभिनेता कुणाल ठाकूरबरोबर मुक्तीने लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या चाहत्यांसह व सहकलारांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहतेही भलतेच खुश झाले आहेत. “त्वयि सम्प्रेक्ष्य भगवान्स्त्वया हि विवाह्यते।” असं कॅप्शन देत त्यांनी लग्नाचे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. त्याचबरोबर “तुझ्यामध्ये मला माझे दैवी संबंध दिसले व आपले एकत्र येणे हे माझ्या नाशिबतच होते. देव, कुटुंब व मित्रांनी दिलेल्या आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे. पती-पत्नी म्हणून आमच्या पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छंसाठी धन्यवाद” म्हटले आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवार व सहकलाकरांनीही त्यांना कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड सिनेसृष्टीतील कलाकारांची लग्नाचा थाट हा वेगळाच असतो. मुक्ती-कुणाल यांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात झाला असून त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याने नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. मुक्तीने शेअर केलेल्या या लग्नाच्या फोटोत तिने पेस्टल रंगाचा व भरजरी नक्षी असलेला लेहेंगा परिधान केला आहे तर कुणालनेही तिच्या कपड्यांना साजेशी अशी शेरवाणी परिधान केली असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी गळ्यात गुलाबांचा सुंदर हारदेखील घातला आहे. तसेच या फोटोंमध्ये दोघेही अतिशय आनंदी व कमालीचे सुंदर दिसत आहेत.
मुक्ती मोहनच्या लग्नसोहळ्यात तिच्या बहिणींनी व कुटुंबीयांनी देखील चांगलीच रंगत आणली होती. दरम्यान, मुक्ती ही एक अभिनेत्री व नृत्यांगना आहे. मुक्ती ‘जरा नचके देखा’, ‘नच बलिये’, ‘फियर फॅक्टर’ व ‘झलक दिखला जा ६’ यांसारख्या रिअॅलिटी शोमधुन लोकप्रिय झाली. त्याचबरोबर ‘साहेब’, ’बीवी और गँगस्टर’, ‘दारूवु’, ‘हेट स्टोरी’, ‘मुरान’ व ‘कांची’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तर कुणाल हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसला होता. तसेच ‘कबीर सिंग’ व ‘कसौटी जिंदगी की’ या चित्रपटांमध्येही तो झळकला होता.