सध्या मनोरंजनविश्वात ‘डंकी’ व ‘सालार’ या चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. काल (२१ डिसेंबर) रोजी ‘डंकी’ व आज ‘सालार’ हे दोन्ही चित्रपट मोठ्या पड्यावर प्रदर्शित झाले. प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘सालार’ व शाहरुख खानचा ‘डंकी’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटांनी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. ‘डंकी’ने प्रदर्शनाच्या पहील्याच दिवशी जवळपास ३० कोटींची कमाई केली आहे. तर प्रदर्शनाच्या आधीच्या तिकीट बुकिंगमध्ये ‘सालार’ने ‘डंकी’ला मागे टाकले आहे. त्यामुळे ‘सालार’ व ‘डंकी’मध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अशातच या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांना चिंतेत पाडणारी एक बातमी समोर आली आहे. (Dunki And Salaar Movie Leaked)
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन साइट्सवर लीक होणे हा जणू आता ट्रेंडचं झाला आहे. अशातच आता ‘डंकी’ व ‘सालार’ हे दोन्ही चित्रपट पायरसीचे बळी ठरले आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, ‘सालार’ व ‘डंकी’चे एचडी व्हर्जन असलेले चित्रपट अनेक ऑनलाइन वेबसाइट्सवर लीक झाले आहेत. आतापर्यंत ३ ते ४ साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना याचा चांगलाच फटका बसला आहे.
शाहरुख खानचे ‘जवान’ व ‘पठाण’ हे दोन्ही चित्रपट हिट झाल्यानंतर ‘डंकी’कडून शाहरुख खान व त्याच्या चाहत्यांना चांगलीच अपेक्षा आहे. तर प्रभासचे गेले काही चित्रपट अयशस्वी ठरल्यामुळे त्यालाही ‘सालार’कडून खूप अपेक्षा आहेत. पण चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे या दोन्ही चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आता हे चित्रपट ऑनलाईन लीक करणाऱ्यांवर काही कारवाई होणार का? ऑनलाइन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर याचा काही परिणाम होणार का? त्याचबरोबर चित्रपटाच्या निर्मात्यांना याचा कितपत फटका बसणार? याची सर्वांनाच चिंता लागली आहे.
दरम्यान, प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार ‘ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच आगाऊ बुकिंगमध्ये चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ४० कोटींचा व्यवसाय केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता ऑनलाईन लीकचा चित्रपटाच्या कमाईवर काही परिणाम होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.