‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेले गायक व गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. गेले काही दिवस ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. मुग्धा-प्रथमेश हे गेले काही दिवस त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांबरोबर लग्नाआधीच्या विधींचे खास फोटो शेअर करत होते. तेव्हा पासूनच हे दोघे कधी लग्न करणार अशी सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आणि अशातच या दोघांनी काल एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. काल (२१ डिसेंबर) रोजी मुग्धा-प्रथमेश यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. हा लग्नसोहळा होताच त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटों व व्हिडीओमधील दोघांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने लग्नात पिवळ्या रंगाची हिरवा काठ असलेली साडी परिधान केली होती. तर प्रथमेशने लाल रंगाचा धोतर, सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचा शेला व पेशवाई स्टाईल पगडी परिधान केली होती. (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Wedding)
मुग्धा-प्रथमेश यांनी त्यांच्या लग्नात एकूण तीन लूक केले होते. एका लूकमध्ये मुग्धाने निळ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती तर प्रथमेशनेही निळ्या रंगाचे सोवळे परिधान केले होते. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या लूकमध्ये पिवळ्या रंगाची साडी व प्रथमेशने धोतर सदरा व पुणेरी पगडी असा खास लूक केला होता. तसेच लग्नानंतरच्या रिसेप्शनसाठी मुग्धा-प्रथमेश यांनी दोन खास लूक केले होते.
आणखी वाचा – रुपालीकडून अद्वैतनंतर आता नेत्रा-इंद्राणीच्या जीवाला धोका, मालिकेला नवं वळण, प्रेक्षकही चक्रावले
यापैकी रिसेप्शनच्या पहिल्या लूकसाठी मुग्धाने गुलाबी साडी व त्यावर साजेसा गोल्डन ब्लाऊज परिधान केला होता. तर प्रथमेशने ऑफ व्हाईट रंगाची शेरवाणी परिधान केली होती. तर रिसेप्शनच्या दुसऱ्या लूकसाठी मुग्धाने जांभळ्या रंगाची साडी व त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतला होता. तर प्रथमेशने आकाशी रंगाची शेरवाणी व त्यावर सोनेरी रंगाचा पायजमा परिधान केला होता.
दरम्यान, मुग्धा-प्रथमेश यांच्या लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे त्यांचा साधेपणा. मुग्धा-प्रथमेश यांनी त्यांच्या लग्नात मोठा गाजावाजा किंवा अवाढव्य खर्च न करता अत्यंत साधेपणाने लग्न केले होते. चिपळूणमधील मोठ्या लॉनमध्ये त्यांनी मोकळ्या मैदानात लग्नाचा मंडप टाकला होता. या मैदानात भव्य रांगोळी, आकर्षक सजावट, फुलांची आरास व विद्युत रोषणाई करत त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.