प्रेक्षकांचा लाडका किंग खान नेहमीच चर्चेत असतो. आजवर शाहरुखने त्याच्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहेच. कायमच प्रेक्षकांच्या मनात असणारा शाहरुखनंतर आता त्याचा लेक आर्यन खानही चर्चेत येऊ लागला असल्याचं चित्र दिसतंय. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या आगामी ‘स्टारडम’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजद्वारे तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, आता किंग खानच्या मुलाच्या आयुष्याबाबत बातमीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आर्यन खान प्रेमात पडला असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. (Aryan Khan Dating News)
आर्यन खानशी संबंधित एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डीजे मार्टिन गॅरिक्सच्या इव्हेंट दरम्यानचा आहे, ज्यामध्ये शाहरुखचा मुलगा अभिनेत्री लॅरिसा बोनेसीबरोबर दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले आहे की, “काही दिवसांपूर्वी मी रेडिटवर एक कमेंट वाचली, ज्यामध्ये आर्यन खान लारिसा बोनेसीला डेट करत असल्याचे लिहिले होते”.
नेटकऱ्याने कमेंटमध्ये पुढे असेही लिहिले की, “मग मी त्या दोघांचे इंस्टाग्राम अकाउंट तपासले तेव्हा मला दिसले की आर्यन अभिनेत्रीला तसेच तिच्या संपूर्ण कुटुंबाला फॉलो करतो. लॅरिसा बोनेसी देखील आर्यनच्या संपूर्ण कुटुंबाला फॉलो करते. लॅरिसाच्या पाळीव कुत्र्याच्या अकाऊंटवरुनही आर्यनला फॉलो केले जात आहे”.
नेटकऱ्याने पुढे अशीही माहिती दिली की, लॅरिसा बोनेसीच्या वाढदिवशी आर्यनने तिला एक गिफ्ट पाठवले होते, ज्याचा फोटो अभिनेत्रीच्या आईने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला होता. युजरने स्वतःची बाजू सांभाळत असंही म्हटलं की, “या सर्व गोष्टी चुकीच्या असू शकतात, कारण मी फक्त अंदाज लावत आहे”. लॅरिसा ही ब्राझीलच्या बोन्सी येथील रहिवासी आहे. ती व्यवसायाने मॉडेल व डान्सरदेखील आहे. अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या ‘देसी बॉईज’ चित्रपटातील ‘सुबाह होने ना दे’ गाण्यातही लॅरिसा दिसली आहे. आर्यनच्या ‘स्टारडम’ वेबसीरिजबद्दल बोलायचे झाले तर, आर्यनच्या या मालिकेत बॉबी देओलही दिसणार आहे.