मालिकाविश्वातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री सविता मालपेकर सध्या एका मुलाखतीमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत. आजवर सविता यांनी छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकांमधील खाष्ट सासू, प्रेमळ आजी यांसारख्या त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. मालिकांसह चित्रपटांमधूनही सविता मालपेकर यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सविता यांनी नुकतीच एका युट्युब चॅनेलला दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. (Savita Malpekar On Ashok Saraf)
सविता मालपेकर यांनी करिअरसंदर्भात, तसेच इंडस्ट्रीत आलेल्या चांगल्या, वाईट अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे, ‘अमृता फिल्म’ या युट्यूब चॅनेलला त्यांनी मुलाखत दिली आहे, या मुलाखती दरम्यान त्यांनी आजवर दारूच्या ग्लासला का हात लावला नाही याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. सविता मालपेकर म्हणाल्या, “मी जेव्हा ‘डार्लिंग डार्लिंग’नाटकामध्ये एंट्री घेतली तेव्हा राजा गोसावी वडिलांसारखे माझ्या पाठीमागे होते. नयनाबाई व राजा गोसावी यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आणि त्यानंतर अशोक सराफ यांनी सांभाळलं. त्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मी खूप लहान होते. या इंडस्ट्रीत राहून मी सगळ्या व्यसनांपासून लांब आहे, याच कारण अशोक सराफ. मी या गोष्टीसाठी त्याचे आभार मानते.
एकेदिवशी ‘डार्लिंग डार्लिंग’चा शंभरावा प्रयोग होता. त्यावेळेला शंभरावा प्रयोग म्हणजे पार्टी वगैरे असायची. ती पार्टी सिटी लाईटच्या निलम हॉटेलमध्ये होती. सगळ्यांसमोर दारुचे ग्लास होते. मी नवीन, कोकणातून आलेली मुलगी होती. त्यामुळे पार्टी वगैरे हा प्रकार जास्त अनुभवला नव्हता. सगळेजण आहेत म्हणून मी पण दारुच्या ग्लासला हात लावला. तेव्हा माझ्या समोर अशोक बसला होता. फक्त माझ्याकडे बघून त्याने डोळ्यांनी नकार दिला. तेव्हा मला कळलं की काहीतरी गडबड आहे” असं त्या म्हणाल्या.
यापुढे त्या म्हणाल्या, “अशोकने मला एक वाक्य सांगितलं होतं. मी कोणत्या परिस्थितीतून आली आहे हे त्याला चांगलंच माहित होतं. माझा कुणीही गॉडफादर नाही. तेव्हा तो मला म्हणाला, तू ज्या घराण्यातून आली आहेस, जे संस्कार घेऊन आली आहेस आणि ज्याच्यासाठी आली आहेस, हे सगळं लक्षात ठेवायचं. मोहाचे खूप प्रसंग येतील. ज्यासाठी आली आहेस ते काम करायचं. या सगळ्यांपासून लांब राहायचं तेव्हाच उत्तम अभिनेत्री होण्याचं जे ध्येय घेऊन आली आहेस ते घडू शकेल, नाहीतर ते घडणार नाही. अशोकचं हे वाक्य माझ्या इतकं डोक्यात बसलं त्यानंतर मला कधीही कसलाच मोह झाला नाही”, असं सविता मालपेकर म्हणाल्या.