मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडीच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर. नारकर कपलची ही जोडी सिनेविश्वात नेहमीच चर्चेत असते. ही जोडी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपलपैकी एक आहे. आजवर ऐश्वर्या व अविनाश यांनी मराठी मालिका, चित्रपट यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मीडियावरही ही बऱ्यापैकी सक्रिय आहे. नेहमीच ही जोडी रील व्हिडीओ बनवत सोशल मिडियावरुन शेअर करत असते. (Aishwarya Narkar Angry On Netizens)
नारकर कपलचे हे डान्स व्हिडीओ मिलियन व्ह्यूजच्या घरात जातात. लाखो प्रेक्षकांची या व्हिडीओला पसंती असली तरी त्यांचे हटके व्हिडीओ पाहून अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बरेचदा ऐश्वर्या या ट्रोलींगवर भाष्य करताना दिसतात. सडेतोड उत्तर देत त्यांनी अनेकांची तोंडही बंद केली आहेत. बॉलीवूड ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाण्यांवर हे जोडपे अनेकदा रील शूट करताना दिसतात. या व्हिडीओवर त्यांना अनेकदा नकारात्मक कमेंट्स येतात, अशातच त्यांच्या एका डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
ऐश्वर्या व अविनाश यांनी नुकताच एका लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. या व्हिडीओवर अविनाश यांचे हावभाव पाहून नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “दोघे एकत्र बरे दिसत आहेत पण श्रीयुत नारकर यांनी तोंडाचे आचरट हावभाव केले नाहीत तर खूप सुसह्य होईल”, अशी कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. या कमेंटला उत्तर देत ऐश्वर्या नारकर यांनी त्या नेटकऱ्याची चांगलीच कानउघडणी केली आहे. ऐश्वर्या यांनी ही कमेंट त्यांच्या स्टोरीला पोस्ट करत, “अनफॉलो केलंत तरी फार सुसह्य होईल. इथे खूप चांगले लोक आहेत. तुम्ही त्यात शोभत नाही”, असं म्हटलं आहे.
तर याच कमेंटवर काही चाहत्यांनी ऐश्वर्या व अविनाश यांची बाजू घेतली आहे. तर एकाने “बघ आता आजोबा लेका स्वत:ला लाज वाटली पाहिजे. काय करतो आजोबा तू”, अशी कमेंट केली आहे. यावर ऐश्वर्या यांनी संताप व्यक्त करत, “लेका झीरो पोस्ट तुझ्या पेजला. लाज तुला वाटायला हवी”, असं म्हटलं आहे.