Aishwarya Narkar On Trolling : ट्रोलिंग हे काही कलाकारांना नवं नाही. कलाकार म्हटलं की ते अनेकदा ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेले दिसतात. बरेचदा अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी या ट्रोलिंगकडे सडेतोड उत्तर देतात. तर काही वेळा या ट्रोलिंगकडे ही कलाकार मंडळी दुर्लक्ष करताना दिसतात. या ट्रोलिंगमध्ये एक मराठमोळं व लोकप्रिय जोडपं नेहमीच अडकले जातात, ते म्हणजे अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. नारकर कपल हे नेहमीच ट्रोलिंगच्या वादात अडकलेले दिसले आहेत. आता पुन्हा एकदा या जोडीला नेटकऱ्याने डिवचताच ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून या दोघांना ओळखलं जातं. आजवर ऐश्वर्या व अविनाश यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय ही जोडी लोकप्रिय गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. या दोघांच्या डान्स व्हिडीओवर मिलियनच्या घरात व्ह्यूज येतात असं जरी असलं, तरीही अनेकदा या जोडप्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या या एकट्याच व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पडताच एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, नेटकऱ्याच्या या कमेंटवर ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या यांच्याबरोबर या व्हिडीओमध्ये अविनाश नारकर दिसत नसल्याने नेटकऱ्याने कमेंट करत त्यांना डिवचलं आहे.
“ते शिमग्यातील सोंग कुठे आहे”, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. यावर ऐश्वर्या भडकलेल्या दिसत आहेत. ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याची ही कमेंट इन्स्टाग्रामला स्टोरीमध्ये पोस्ट केली आहे. आणि त्यावर कॅप्शन देत नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. “स्वतःची लायकी सिद्ध करताय का?, भोसले नावाचं काहीतरी कर्तृत्व असुद्या”, असं म्हणत ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याला ठणकावलं आहे.