Navri Mile Hitlerla Serial : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कधी एजे व लीला यांच्यामधील मैत्री, कधी त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, तर संकटात अभिरामने लीलाला केलेली मदत अशा कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होताना दिसत आहे. अशातच आता मालिकेत नुकतेच लीला अभिरामच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. जहागीरदार कुटुंब परदेशात फिरायला गेले असताना त्यांच्यातील प्रेम अधिक बहरल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला होता. अशातच आता मालिकेत एक अनपेक्षित वळण आले आहे. (Navri Mile Hitlerla Serial Update)
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यात लीला व एजे यांच्यात गैरसमज निर्माण होणार असल्याचे पाहायला मिळत आहेत. या नवीन प्रोमोमध्ये लीलाने एजे व अंतराच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असून तिने अंतराचे जुनी साडीही परिधान केली आहे. पण हीच गोष्ट एजेला आवडली नसून त्याने यावेळी लीलाला असं म्हटलं की, “तु माझ्या आणि अंतराच्या मध्ये येणार असशील तर तुला या घरात जागा नाही. तुला मी शेवटचे सांगत आहे, तुला जर या घरात अंतराची जागा न घेता फक्त लीला म्हणून राहायचे असेल तरच राहा. नाहीतर इथून जा”.
‘नवरी मिळे हिटलरला’च्या सोमवारच्या भागात लीलाने एजे व अंतरा यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन केले होते. अंतराच्या फोटोपुढे लिहलेल्या पत्रामध्ये लीलाने अंतरासारखे वागावे असं लिहिलं होतं. मात्र हा सरस्वती, दुर्गा व किशोर यांचा प्लॅन होता. त्यांच्या प्लॅनमध्ये लीला फसते आणि ती एजेंना जे आवडत नाही तेच करुन बसते. त्यामुळे लीला अंतराची जागा घेत असल्याचा गैरसमज निर्माण होऊन एजे लीलावर चिडतात. या गैरसमजातून ते लीलाला या घरात न राहण्याचेही सांगतात. यामुळे लीला दुखावली जाते.
आणखी वाचा – ‘आहट’ हॉरर शो आता मराठीत, सोनी मराठीकडून घोषणा, २० वर्षांनी पुन्हा एकदा पसरणार भीतीचे सावट
त्यामुळे एकीकडे लीला एजेंच्या प्रेमात पडत आहे तर दुसरीकडे एजे लीलाला दूर जायला सांगत आहेत. त्यामुळे आता लीलाला दुर्गा, सरस्वती यांच्या प्लॅनमध्ये फसणार की? यातून लीला स्वत: मार्ग लढत एजेंच्या मनात आपलं स्थान निर्माण करणार? हे आगामी भागातून पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसादही दिला आहे.