‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेच्या रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस आणखीनच रोमांचकारी व उत्कंठावर्धक होताना दिसत आहे. मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत विरोचकाने रुपालीला दिलेल्या शक्तीमुळे रुपाली राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येकालाच वश करतानाचा ट्विस्ट पाहायला मिळाला. त्यामुळे ही मालिका आता नव्या वळणावर येऊन पोहचली आहे.
मालिकेत रुपालीने नेत्रा, इंद्राणी व अजिंक्य यांना सोडून कुटुंबातील सर्वांनाच वश केले आहे. त्यामुळे नेत्रा व इंद्राणी यांना कुटुंबाची चिंता लागून राहिली आहे. त्यात देवीआई मूर्च्छित पडल्याने देवीआईही काही मदत करणार नसल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे नेत्रा व इंद्राणी त्यांच्या पद्धतीने रुपालीला अडवतानाचे पाहायला मिळत आहे. नुकताच याबद्दलचा एक प्रोमो समोर आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा व इंद्राणी रुपालीच्या डोळ्यांत तिखट मसाला टाकून तिला तिला साखळीने बांधतात व तिला एका कालकोठडीत डांबून ठेवतात. या प्रोमोला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून काहींना हा नवीन प्रोमो आवडला नसल्याचे म्हटलं आहे. या प्रोमोखाली एकाने “ही मालिका म्हणजे ‘शैतान’ची चित्रपटाची कॉपी आहे” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “लोकांना बावळट बनवत आहेत” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – बायकोच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची खास पोस्ट, एकत्र फोटोही शेअर केला, म्हणाले, “तुझ्याविना माझं…”
तर अनेकांनी “बस करा आता थांबवा ही मालिका, लवकर संपवा आता, मालिकेत अती झालं आहे, ही मालिका बघितली की डोक्यात तीव्र सणक जाते,” अशा अनेक कमेंट्स करत आपली नाराजी दर्शवली आहे. तर एकाने अरे घाणेरडे, आणि घृणास्पद प्रोमो दाखवू नका. लहान लहान मुले घाबरतात. Zee Marathi तुम्हाला लोकांना काय आवडतं कळतच नाही पण लोकांनां काय आवडत नाहीत ते तरी कळू दया” अशीही एक कमेंट केली आहे.
त्याचबरोबर अनेकांनी त्यांना हा ट्विस्ट आवडला असल्याचे म्हटले आहे. “आताही मालिका बघायला मज्जा येईल, आता काहीतरी मनोरंजक पाहायला मिळेल. आता मालिकेविषयी उत्सुकता वाढली आहे, मालिका बघायला आता खूपच मजा येईल” अशा सकारात्मक कमेंट करत त्यांनी प्रतिसाद दिला आहे.