एखाद्या कथेत नायक, नायिका जितकी महत्त्वाची असते. तितकाच किंबहूना त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो तो म्हणजे खलनायक. खलनायकाशिवाय एखाद्या कलाकृतीची कल्पना करणंही हे दिग्दर्शक-निर्मात्यांसाठी अवघड असतेच. त्यापेक्षा प्रेक्षकांच्या मनाला ते न पटणारे नसते. त्यामुळे खलनायक हा कितीही क्रूर, विकृत असला तरीदेखील प्रेक्षक त्यांना पाहतातच. बऱ्याचदा खलनायकांना त्यांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिसादही मिळतो.
चित्रपटात हा खलनायक जितका महत्त्वाचा असतो, तितकाच तो मालिकेमध्येदेखील महत्त्वाचा असतो. छोट्या पडद्यावरील अशीच एक लोकप्रिय खलनायिका म्हणजे ऐश्वर्या नारकर. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या रुपाली या व्यक्तिरेखेद्वारे खलनायकाची भूमिका साकारत आहे. मात्र या मालिकेत त्यांच्याऐवजी अनेक लोकप्रिय अभिनेत्रींचा विचार केला गेला होता. असं मालिकेच्या दिग्दर्शकाने सांगितले आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचे दिग्दर्शक जयंत पवार यांनी मालिकेच्या ५००व्या भागानिमित्त ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी त्यांना पात्रांच्या निवडीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर देत त्यांनी असं म्हटलं की, “रुपाली या भूमिकेसाठी हर्षदा खानविलकर, शिल्पा नवलकर, सुप्रिया पाठारे यांचा विचार केला गेला होता. मात्र मला अलका कुबल पाहिजे होत्या. मला रुपाली या भूमिकेसाठी एक असा चेहरा पाहिजे होता, ज्यांनी कधी मुंगीही मारली नसेल”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मग आम्ही ऐश्वर्या नारकर यांना विचारलं. तेव्हा त्या ही मालिका करतील की नाही माहिती नव्हतं. पण त्यांनी होकार दिला. त्यांना मालिकेची पूर्ण कथा आधी सांगितली नव्हती. टप्प्याटप्प्याने त्यांना या मालिकेच्या कथानकाविषयी सांगण्यात आले आणि अशाप्रकारे रुपाली पात्रासाठी ऐश्वर्या नारकरांचं कास्टिंग करण्यात आलं.”
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. मालिकेची कथा प्रेक्षकांना आवडत असून मालिकेच्या नवीन ट्विस्टबद्दल सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींना ही मालिका आवडत आहे, तर काहीजण ही मालिका बंद करण्याची मागणी करत आहेत.