‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून आपल्या निरागस हास्याने सर्वांचे मनोरंजन करणारा विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’शिवाय ‘टाइमपास’, ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही भाऊ कदम झळकले आहेत. मात्र ‘चला हवा येऊ द्या’ या शोने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. या शोमध्ये भाऊ कदम यांनी नानाविध भूमिका साकारल्या. पण या शोमधील त्यांनी साकारलेल्या स्त्री भूमिकांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये साकारलेल्या स्त्री भूमिकांचे कौतुक म्हणून नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्यात त्यांची ओटी भरण्यात आली. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात अभिनता अद्वैत दादरकरने स्त्रीच्या वेशात येऊन भाऊ कदम यांची ओटी भरल्याचे पाहायला मिळाले. “माझी बहीण बघ बहीण” असं म्हणत अद्वैत एंट्री करतो आणि यापुढे तो “अख्ख जग याला भाऊ म्हणतं पण ही माझी बहीण आहे” असं म्हणत भाऊ कदम यांच्या जवळ जातो.
यानंतर तो “मला भाऊ कदमची ओटी भरायची आहे” असं म्हणत त्यांची खणा-नारळाने ओटी भरतो. यावर भाऊ कदमही आपल्या कुर्त्यामध्ये ती ओटी स्वीकारतात आणि यानंतर अद्वैत भाऊ कदम यांचे कौतुक करत असं म्हणतो की, “मला तुमचे कौतुक करायचे आहे की, इतके वर्ष तुम्ही शांताबाई करत आहात. इतकी वर्षे स्त्री भूमिका करत आहात. स्त्री भूमिका करताना चेहऱ्याच्या सौंदर्याला नाही तर मनाच्या सौंदर्याला महत्त्व आहे हे या माणसाने अख्ख्या जगाला सांगितलं.”
अद्वैत दादरकर व भाऊ कदम यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, भाऊ कदम यांचं रंगभूमीवरील ‘करून गेलो गाव’ हे नाटक चांगलंच चर्चेत आहे. या नाटकात त्यांना ओंकार भोजनेची साथ लाभली आहे.