मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांत एकामागून एक कलाकार आपल्या नात्याची कबुली देताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही कलाकारांनी ही लग्न उरकली आहेत. अशातच ‘सारेगमप’च्या ‘लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुली दिली. ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. आता हे जोडपं लग्नबंधनात कधी अडकणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. अशातच मुग्धाने तिच्या केळवणाचे काही फोटो शेअर केले आहेत. मुग्धाच्या आजोळी नुकतंच तिचं केळवण पारंपारिक पद्धतीने थाटामाटात पार पडलं. या खास कार्यक्रमाचे काही फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Mugdha Shared Photo Of Her Kelvan)
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांच्या नात्याची कबूली दिल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून आहे. अशातच या जोडप्यांच्या लग्नापुर्वीच्या पारंपारिक रितीरिवाजांना सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्याच्या पहिल्या केळवणाची झलक दाखवली होती. त्यानंतर आता मुग्धाच्याही आजोळी तिचं केळवण पार पडलं.
वाचा – आजोळच्या पक्वान्नात नेमकं होतं तरी काय?(Mugdha Shared Photo Of Her Kelvan)

मुग्धाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली. त्यात तिने पुण्यातील तिच्या आजोळच्या घरी साजऱ्या झालेल्या केळवणाचे काही क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहे. या फोटोंमध्ये फुलांची सजावट केली आहे. तसेतिच्यासमोर मांडलेल्या पंचपक्वानांच्या ताटासह तीने एक गोड स्माईल देत फोटो शेअर केला आहे. तिच्यासमोर मांडलेल्या ताटात पुरणपोळी, करंजी, श्रीखंड, शिरा आणि जलेबी सारख्या गोड पदार्थांचा तर, सुरळीच्या वड्या, अळूची भाजी, बटाट्याची भाजी, वरण-भात अशा पारंपारिक पदार्थांचा समावेश होता. ‘आजोळचं केळवण’ असं लिहित मुग्धाने हा फोटो शेअर केला आहे.

मुग्धा आणि प्रथमेश यांनी दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी लग्न येत्या सहा महिन्यात करणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच हे लग्न पारंपारिक पद्धतीने मराठमोळ्या थाटातच करणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं होत. आता हे जोडपं त्यांच्या लग्नाची तारीख कधी उघड करणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहील आहे.