मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते म्हणजे राजन पाटील. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तोची एक समर्थ’, ‘तरूण तुर्क म्हातारे अर्क’ सारख्या विविध नाटक, चित्रपट, मालिकांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मनोरंजन क्षेत्राव्यतिरिक्त ते उत्तम लेखकही आहेत. त्यांनी ‘रंग माझा’, ‘माझी माणसं’ अशी स्वतःच्या आयुष्यावर पुस्तकही लिहीली आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते अनेक गंभीर आजारांमुळे त्रस्त आहेत. काही वर्षांपूर्वी “माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत…”, असं म्हणत पोस्ट शेअर केली होती. ती बरीच चर्चेत होती. त्यानंतर राजन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्रस्त असलेल्या आजाराविषयी भाष्य केलं. (Actor Rajan Patil Shared Post)
राजन पाटील यांनी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट शेअर केली. “नमस्कार मंडळी. १३ ऑगस्ट रोजी दिवसभरात तुम्ही सर्वांनी माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून माझं अभिष्टचिंतन करून माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलंत याबद्दल मी तुमचा निरंतर ऋणी आहे. व्हॉट्सएप, फेसबुक याद्वारे शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद यांचा वर्षाव झाला. अनेकांनी प्रत्यक्ष फोन करून शुभेच्छा दिल्या. काही जणांचे फोन मी घेऊ शकलो नाही. क्षमस्व. तर मंडळी, मी वयाची सत्तरी पूर्ण केली आणि एकाहत्तराव्या वर्षात पदार्पण केले. आता तुम्ही सर्वप्रथम माझं कुटुंब. माझे आई-वडील, भावंडं, चाळीतले शेजारी, मुंशिपालटीची प्राथमिक शाळा यांच्या सहवासात माझा पिंड पोसला गेला. आपण बरोबर असू तर कोणालाही घाबरायचे नाही, हा गुण (की दुर्गुण?) अंगी बाणलाच नाही तर मुरला”.
वाचा – अभिनेता राजन पाटील आजारावर काय म्हणाले?(Actor Rajan Patil Shared Post)
पुढे आजारपणाबाबत भाष्य करताना त्यांनी लिहीलं, ”आयुष्याच्या या प्रवासात माझ्या प्रकृतीवर खूप आघात झाले. गूढ ज्याचं कारण किंवा नाव मला अद्यापही माहीत नाही आजार, पोलिओ, टायफॉइड, कॅन्सर, अनेक रस्ता अपघातांमुळे झालेली हाडांची मोडतोड असा अनेक आजारांशी लढलो आणि त्यांना पिटाळून लावले. आतापर्यंत माझी अकरा ऑपरेशन्स झाली आहेत. म्हणजे गंमत बघा मी फक्त नाटकाच्या थिएटरवर प्रेम केलं असं नाही तर तितकेच प्रेम ऑपरेशन थिएटरवर सुद्धा केले. आता गेली दहा वर्षे मी पार्किन्सन्स या आजाराशी लढतोय. लढाई कठीण आहे. पण लढणे हा माझा हक्क आहे. माझा स्वभाव आहे. या लढाईत तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची मला गरज आहे. त्या तुमच्याकडून मिळतील याची मला खात्री आहे. गेली तीन वर्ष माझ्या अभिनयाच्या क्षेत्रापासून मी दूर आहे. पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी माझी अवस्था झाली आहे. पुन्हा कार्यरत होण्याची जबरदस्त इच्छा आहे, बघुया” अस म्हणत त्यांनी त्यांची आजारीची व्यथा सांगितली आहे.
पुढे कौटुंबिक पातळीवर समाधानी असल्याचे सांगताना त्यांनी, ”या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. सगळे माझी सदैव काळजी घेतात. हे समाधान सगळ्यांच्या नशिबात नसतं. माझ्या या आजारपणामुळे एक गोष्ट झाली. मला आपलं कोण हे समजलं. जे माझे वाटत होते ते लोकं हळूहळू दूर झाले. अर्थात याबाबत माझी कुठलीही तक्रार नाही”. राजन पाटील यांचं आयुष्य आणि त्यांशी शेअर केलेली पोस्ट मनाला चटका लावणारी आहे.