कॉमेडी विश्वात कपिल शर्मा सध्या अग्रेसर आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’मधून त्याने अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यानंतर तो नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ घेऊन आला. नेटफ्लिक्समुळे आता तो जगभरात पोहोचला आहे. माजी क्रिकेटर आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू हे कपिल शर्मा शोच्या आधीच्या सीझनचा एक महत्त्वाचा भाग होते. कॉमेडियन कपिल आणि इतर कलाकारांबरोबरची त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली होती. (Navjyot Singh Sidhu On The Kapil Sharma)
काही कारणास्तव २०१९ मध्ये नवज्योत सिद्धू यांनी कपिलचा शो सोडला. त्यांच्या जाण्यानंतर अर्चना पूरण सिंहने शोमध्ये प्रवेश केला. अशातच आता नवज्योत सिद्धू पुन्हा एकदा कपिलच्या शोमध्ये दिसणार आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनच्या पुढच्या एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आपल्या पत्नीबरोबर येणार आहेत. त्याचा प्रोमोही रिलीज झाला आहे. यावेळी त्यांनी कपिल शर्मा शो सोडल्याबद्दलचे नेमके कारण सांगितले आहे.
याबद्दल ते म्हणाले की, “राजकीय कारणे होती आणि मला त्याबद्दल बोलायचे नाही. वेगवेगळी कारणे होती आणि गुलदस्ता तुटला. माझी इच्छा आहे की पुष्पगुच्छ जसा होता तसाच एकत्र ठेवला जाईल. तर, कपिलचा शो खूप चांगला चालला आहे. तो बऱ्यापैकी हुशार आहे. द ग्रेन टॉक शोला दिलेल्या मुलाखतीत सिद्धू यांनी कपिल शर्माबरोबर काम करतानाचा अनुभवही शेअर केला. याबद्दल त्यांनी सांगितले की, “जेव्हा तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो’मध्ये होता तेव्हा त्याच्या शोच्या अनेक सीझनमध्ये ते कपिलबरोबर होते.
कपिलबरोबरच्या कामाबद्दल बोलताना सिद्धू म्हणाले की, “त्यांचा शो हा देवाने तयार केलेल्या गुलदस्त्यासारखा आहे ज्यामध्ये प्रत्येक सदस्याने स्वतःचे आकर्षण जोडले आहे”. दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांनी कपिल शर्मा शो जेव्हा सोडला तेव्हा असे बोलले जात होते की, त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्याच्या एका कमेंटवरून वाद झाला होता, त्यानंतर त्याने शो सोडला होता.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर अर्चना पुरण सिंह यांनी शोमध्ये सहभाग घेत त्यांची जागा घेतली आणि गेले काही दिवस त्या कपिल शर्मा शोच्या महत्त्वाच्या भाग बनल्या आहेत. हा शो प्रेक्षकांना हसवण्याचे काम करतो. गेली अनेक वर्षे कपिल शर्माने प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण केलं आहे आणि ते गारुड अजूनही कायम आहे.