Saorabh Choughule Exclusive : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये अभिनेत्री योगिता चव्हाणच्या एण्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. जीव माझा गुंतला या मालिकेतून योगिता घराघरांत पोहोचली. सोशल मीडियावरही योगिता बऱ्यापैकी सक्रिय असते. अभिनयाबरोबरचं योगिताला नृत्याचीही आवड आहे. योगिता काही दिवसांपूर्वी चर्चेत आली ती म्हणजे तिच्या लग्नामुळे. योगिताने जीव माझा गुंतला मालिकेतील मुख्य अभिनेता सौरभ चौघुलेसह खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. अगदी शाही थाटामाटात योगिताचा लग्नसोहळा पार पडला. सध्या योगिता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसते. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर पहिल्याच दिवशी योगिता भावुक झालेली दिसली. यावेळी तिला नवऱ्याची आठवण येऊ लागली, असल्याचं तिने सांगितलं.
नुकतीच सौरभने इट्स मज्जाला मुलाखत दिली. यावेळी सौरभने योगिताच्या ‘बिग बॉस मराठी’ मधील प्रवासाबाबत अनेक खुलासे केले. योगिता ‘बिग बॉस’च्या घरामध्ये तुझ्या आठवणीत रडताना दिसली. तो एपिसोड बघताना तुझ्या मनात नक्की काय सुरु होतं?”, असा प्रश्न सौरभला विचारण्यात आला. यावेळी उत्तर देत सौरभ म्हणाला की, “मी योगितापेक्षा दहा पटीने भावनिक आहे. मी माझ्या माणसांपासून फार काळ लांब राहू शकत नाही. माझे खूप मित्र-मैत्रिणी आहेत. ते सतत मला माझ्याबरोबर लागतात. हेही एक कारण आहे की, मी ‘बिग बॉस’मध्ये गेलो नाही. योगिताला रडताना पाहून माझी पहिली प्रतिक्रिया हिच होती की, आज पहिलाच दिवस आहे आता रडू नको”.
आणखी वाचा – अनुष्का शर्माने पहिल्यांदाच दाखवली लेकाची झलक, सहा महिन्यांचा चिमुरडा करत आहे ‘हे’ काम, फोटो व्हायरल
पुढे तो म्हणाला, “आम्ही आताच पवईमध्ये राहण्यासाठी गेलो आहे. तिला रडताना जेव्हा मी पाहिलं तेव्हा लगेचच मी माझ्या आई-बाबांकडे निघून गेलो. कारण मी योगिताच्या डोळ्यांमध्ये कधीच पाणी बघू शकत नाही. फक्त योगिताच नाही माझ्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी असेल तर मलाही रडू येतं. योगिताला घेऊन मी जरा जास्तच भावनिक आहे. तिला राग जरी आला तर मला आधी रडू येईल. पण ती रडली याचं मला समाधान आहे. कारण ती फार व्यक्त होत नाही. तिथे ती व्यक्त झाली याचं मला बरं वाटलं. कारण पहिल्याच दिवशी घरामध्ये खूप भांडणं झाली. पण तिला विनाकारण आरडाओरडा आवडत नाही”.
यापुढे तो बायकोच्या स्वभावाबाबत असंही म्हणाला की, “जिथे काही चुकीचं घडणार तिथे ती पहिली उभी असणार. मात्र उगाच भांडणं करणार नाही. सध्या त्या घरात शक्तीप्रदर्शन सुरु आहे. मीच किती श्रेष्ठ आहे हे प्रत्येकाला तिथे दाखवायचं आहे. लोकांना वाटलेलं की, योगिता दिसत नाही बोलत नाही. पण योगिता जेव्हा बोलेल तेव्हा त्याची चर्चा होणारच याची मला खात्री होती”.