‘झी मराठी’ वाहिनीने कायमच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठी ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमातून लहान मुलांचे अनेक नवीन टॅलेंट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या लहान अतरंगी मुलांचं परीक्षण अभिनेत्री अमृता खानविलकर व अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करणार आहे. तसंच सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री जबाबदारी ‘झी मराठी’च्या जुन्या व लोकप्रिय कलाकाराकडे देण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
या कार्यक्रमाप्रमाणेच ‘ड्रामा ज्युनिअर्स’चा सेटदेखील अगदी खास आहे. इतर शोच्या सेटपेक्षा हा सेट खूपच हटके दिसत आहे. ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोचा सेट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या सेटवर लहान मुलांच्या आवडीच्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. त्यामुळे लहान मुलं आणि सामान्य प्रेक्षकासह प्रत्येकालाच हा सेट व सेटवरील अनेक गोष्टी भावत आहेत. अतिशय भव्यदिव्य असा हा सेट आहे. नक्की काय काय आहे या सेटवर. चला जाणून घेऊयात…
‘ड्रामा ज्युनिअर्स’चा सेट अगदी भव्यदिव्य असून बार्बी कार्टूनमधील मोठ्या बंगल्यांच्या प्रतिकृती या सेटवर उभारण्यात आल्या आहेत. या सेटवर असे तीन बंगले असून यावर ‘लाइट्स’, ‘ड्रामा’ आणि ‘अॅक्शन’ अशी नवे देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या सेटवर लहान मुलांसाठी खास आसनव्यवस्थाही करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या सेटवर येणाऱ्या प्रेक्षकांसाठीही खास आसनव्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांच्या आवडीप्रमाणेच या सेटवर अगदी खास वस्तूंची सजावट करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या नव्या कार्यक्रमाची घोषणा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. त्यानंतर कार्यक्रमासाठी विविध शहरातून लहान मुलांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या आणि त्यातून अतरंगी मुलांना निवडण्यात आलं. अशातच आजपासून दर शनिवार व रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यकम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.