सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे बाईपण भारी देवा या चित्रपटाची. केदार शिंदे दिगदर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. संपूर्ण महाराष्ट्रभरातून या चित्रपटाचं कौतुक होताना देखील पाहायला मिळतंय. स्त्रीयांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट फक्त महिलावर्गाच्याच नाही तर पुरुष मंडळींच्याही चांगल्याच पसंतीस उतरला. या चित्रपटाचं सर्व स्तरातून कौतुक होत असताना आता अभिनेत्री सुकन्या मोने यांचे पती आणि प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी देखील कौतुक केलं.संजय मोने यांनी केलेल्या कौतुकाचा किस्सा सुकन्या यांनी Itsmajja ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.(Sukanya Mone)
सुकन्या मोने या वेळी बोलताना म्हणाल्या संजय कडून कौतुक मिळवणं हे म्हणजे ऑस्कर जिंकल्यासारखं आहे. माझं या चित्रपटातील काम बघून संजय म्हणाला “सुकन्या काय जागा शोधल्या आहेस तू कमाल”.
संजय मोने यांच्याकडून मिळालेल्या या कमेंटमुळे सुकन्या मोने भारावलेल्या देखील दिसल्या.
बाईपण भारी देवा चित्रपट आणि कलाकारांचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. विशेष म्हणजे या चित्रपटात सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या मुलीने देखील भूमिका पार पडली आहे. त्यामुळे संजय यांच्या कौतुकाची थाप केवळ सुकन्या मोने यांनाच नाही तर लेकीला देखील मिळाली असणार यात शंकाच नाही.(Sukanya Mone)
पुरुषांनी देखील बघाचं…(Sukanya Mone)
या चित्रपटाच्या कौतुकाखातर संजय मोने यांनी एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय “माझ्या मते चित्रपट हे मुख्यत्वे मनोरंजनासाठी असतात. कारण गर्दीने एकत्र येऊन बघण्याचा तो एक कार्यक्रम असतो.सोहळा खरं तर. प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे याचा अंदाज चुकू शकतो, पण हल्ली प्रामुख्याने समाज माध्यमांवर उत्तम प्रतिक्रिया कशामुळे येतील याचा अंदाज बांधून चित्रपटाची आखणी होते. सर्वसाधारण इतर चित्रपटांची होते तशीच त्याची जाहिरात केली गेली काहीही आगळं वेगळं त्यात नव्हतं.पण लोकांनी तो पाहिला आणि इतरांकडे त्याची शिफारस केली परिणामी तो चित्रपट आज गर्दी खेचतो आहे.
हे देखील वाचा- ‘बाईपण भारी देवा’…. खेळकर आणि इमोशनल
सर्व प्रथम उत्तम संहिता लिहिणा-या लेखकाचे अभिनंदन.काय असं आहे त्या संहितेत?सहा बहिणींची कथा.त्यांचे आपसात संबंध काहीसे ताणलेले.जे आपल्याला हल्लीच्या कुटुंबात पाहायला मिळतात.एकत्र कुटुंब पद्धती नसण्याच्या काळात लेखक तुम्हाला त्याचा कुटुंब शरीराने एकत्र नसतांनाही एकवटले पणाचा अनुभव देतो.लांब लांब राहणा-या भावंडांना मायेचा ओलावा म्हणजे काय हे चित्रपट दाखवून देतो.सगळ्या बहिणी कुठल्या कारणांमुळे एकत्र येतात ते कारण फार सुंदर पद्धतीने लेखकाने बेतले आहे. सगळ्यात शेवटी नायक प्रधान चित्रपट व्यवस्थेत संपूर्ण नायिका प्रधान चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल निर्मात्यांचे आभार.अगदी जरूर जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. नाव जरी बाईपण भारी देवा असं असलं तरी पुरुषांनीही जरूर बघा.
संजय मोने यांच्या या पोस्ट वर देखील कमेंट करत चाहत्यांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.