रोज नवे रंग फासून
हसतेस दु:खावर
स्वप्न रोज तासून तू
ठेवतेस गाडाभर
जीव तुझा भात्यापरी
रोज होई खालीवर
ठिणगीला भीडणारी आगर
बाईपण भारी देवा
बाईपण भारी रं….(Baipan Bhari Deva Movie Review)
वैशाली नाईक लिखित, माधुरी भोसले निर्मित व केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा ‘ या सहा सख्ख्या बहिणींचे भिन्न स्वभाव, दृष्टिकोन, जीवन प्रवास असलेल्या नायिकाप्रधान चित्रपटाचे हे मध्यवर्ती सूत्र.
मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत नायिकाप्रधान चित्रपटांची आपली एक वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल आहे. ‘मानिनी ‘ ते ‘माहेरची साडी ‘ आणि ‘एकटी ‘ ते ‘सखी ‘ अशी अनेक उदाहरणे आहेत. केदार शिंदेनेही ‘अगं बाई अरेच्चा ‘ ( २००४) मध्ये स्रीच्या मनात काय चाललंय हे पुरुषांना समजते, ऐकू येते अशी फॅन्टसी साकारत समिक्षक व रसिकांची दाद मिळवली.
‘बाईपण….’ या सगळ्या परंपरेत थोडा वेगळा. चाळीशी ओलांडलेल्या आणि आपापल्या आयुष्याच्या सुख दु:खात जगत असलेल्या सहा बहिणी मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येत जातात आणि या चित्रपटाची गोष्ट आकार घेत घेत जाते. चित्रपटाची सुरुवात काहीशी विस्कळीत आहे, लेखिकेला काय म्हणायचंय आणि दिग्दर्शकाला नेमके काय मांडायचयं हे लक्षात येत नाही. जेव्हा ते स्पष्ट होते तेव्हा हळूहळू चित्रपट रंगत रंगत जातो आणि एकाच वेळेस भावनिक गोष्टी आणि खेळकर/खोडकरपणा यांची पकड घट्ट होत जाते आणि चित्रपट भरपूर मनोरंजन करतो. या प्रत्येकीची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्या प्रत्येकीची आपली एक गोष्ट आहे. अशातच त्यांना जाणीव होते, अर्ध आयुष्य संपले आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही. (Baipan Bhari Deva Movie Review)

कधीच कोणी म्हटलं नाही… थांब श्वास घे… नेमक्या याच टप्प्यावर चित्रपटामागची भूमिका स्पष्ट होते. गिरगावातील खोताची वाडीत या सहा बहिणी स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी एकत्र येतात आणि मग लहान लहान गोष्टीत रस निर्माण होतो. तरी काही काही दृश्य थोडी लांबलीत त्याकडे लक्ष द्यायला हवे होते.
अशी जमलीये मैत्रिणींची गट्टी(Baipan Bhari Deva Movie Review)
रोहिणी हट्टंगडी ( जया), वंदना गुप्ते ( शशी), सुकन्या कुलकर्णी ( साधना), सुचित्रा बांदेकर ( पल्लवी), शिल्पा नवलकर ( केतकी), दीपा परब चौधरी ( चारु) या सहा जणींनी बहिणीच्या भूमिका साकारल्यात. भिन्न आर्थिक स्तर आणि प्रत्येकीच्या वाटेवरचे भिन्न अनुभव ही गोष्ट फार महत्वाची ठरलीय. म्हणूनच मग या सहाही बहिणीत कोणाचे कोणाशी का पटतयं अथवा का जुळवून घेता येत नाही यावर छान फोकस पडलाय.
गोष्टीतील हा धागा प्रभावी ठरलाय. याशिवाय या चित्रपटात शरद पोंक्षे, तुषार दळवी, सुरुची आगरकर, स्वप्नील राजशेखर, पियुष रानडे, सतीश जोशी यांच्याही भूमिका आहेत. छायाचित्रण वासुदेव राणे, संकलन मयूर हरदास, संगीत व पार्श्वसंगीत सई पियुषी यांचे आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची ठुमरी रिक्रियेट करुन या चित्रपटात बॅकग्राऊंडला येते, या गोष्टीचा खास उल्लेख हवा.
चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत थीमनुसार ‘महिलाकेंद्रित इव्हेन्टस ‘ आयोजित केले हे महत्वाचे. तसे करणे आवश्यक असतेच. दिग्दर्शक केदार शिंदेचा ‘महाराष्ट्र शाहीर ‘ या चित्रपटाच्या पाठोपाठच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दोन्हीची पठडी वेगळी.
जियो स्टुडिओ, सहनिर्माते अजित भुरे आणि बेला केदार शिंदे यांचा हा चित्रपट पुरुषांनाही बाईपणाची जाणीव करुन देईल हे निश्चित.
बाई पण भारी देवा चित्रपटाला आम्ही देत आहोत तीन स्टार
लेखक : दिलीप ठाकूर