मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांची वैयक्तिक आयुष्य ही नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अनेक कलाकार मंडळी या विवाहबाह्य संबंधांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असते. मनोरंजन सृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे संजय खान. संजय खान यांनी ७०-८०च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मात्र त्यांच्या अभिनयाशिवाय त्यांच्या विवाहबाह्य संबंधामुळेही त्यांची बरीच चर्चा झाली होती.
एबीपीच्या वृत्तानुसार, संजय खान यांची पत्नी जरीन खान हिनेच याबद्दल खुलासा केला होता. वास्तविक, जेव्हा संजय व त्यांच्या पत्नीने सिमी ग्रेवालच्या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा जरीनने सांगितले होते की, संजय खान आपली फसवणूक करत असल्याविषयी तिला माहीत होते. यातही मोठी गोष्ट म्हणजे अभिनेत्यानेही आपली चूक मान्य केली. त्याकाळी झीनत अमान व संजय खान यांच्या अफेअरच्या बातम्या खूप रंगल्या होत्या. लग्न झाल्यानंतरही संजय झीनतला डेट करत होता. त्याचबरोबर दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
१९८०मध्ये ‘अब्दुल्ला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय व झीनत यांच्या अफेअरची सुरुवात झाली होती. त्यावेळी संजयची पत्नी जरीन खान गर्भवती होती. याबद्दल सिमीने जरीनला विचारले असता, जरीनने असं म्हटलं होतं की, “हो, मी त्यावेळी आई होणार होते. मला सगळं माहीत होतं. पण मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखत होते. माझे लग्न मोडेल असे मला कधीच वाटले नव्हते. जरी तो चुकीचा होता, तरीही जेव्हा तुम्ही अभिनेत्याची पत्नी असता तेव्हा धीर धरणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या प्रेमात पडणारी ही कुणी पहिली स्त्री नव्हती. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक अभिनेत्री होत्या. पण संजय हे फक्त माझे आहेत, हे मला माहीत होते.”
दरम्यान, संजय खान यांनी १९६४मध्ये चेतन आनंद यांच्या ‘हकीकत’मध्ये एका सैनिकाची छोटीशी भूमिका साकारून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी ‘दस लाख’, ‘एक फूल दो माली’, ‘इंतेकाम’, ‘शर्त’, ‘मेला’, ‘उपासना’ आणि ‘नागिन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.