Salman Khan Singham Again Movie : रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात खूप मोठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खान देखील झळकणार होता. त्याच्या कॅमिओ भूमिकेची खूप चर्चा होत होती, मात्र आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भाईजान यापुढे या चित्रपटात दिसणार नाही, असे ताज्या अहवालात म्हटले गेले आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सलमान खान यापुढे ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचा भाग असणार नाही. सलमानला सतत मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.
रिपोर्टनुसार, ‘मुंबईच्या गोल्डन टोबॅकोमध्ये एक दिवसाचे शूटिंग होणार होते, पण बाबा सिद्दिकीच्या हत्येमुळे शूटिंग रद्द करण्यात आले. यानंतर, रोहित व अजयने अंतर्गत चर्चा केली आणि लक्षात आले की या वादात सलमान खानला शूट करण्याची विनंती करणे असंवेदनशील आहे. चित्रपटाला अजून सेन्सॉर बोर्डाकडे जायचे आहे, त्यामुळे त्यांनी सलमानच्या अनुपस्थितीशिवाय तो सीबीएफसीकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या बातमीनुसार, पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये चुलबुल पांडेचा बॅकशॉट देखील असू शकतो. मात्र याबाबत अधिकृत असे काही स्पष्टीकरण समोर आले नाही.
सलमान खानने ‘दबंग’ चित्रपट आणि त्याच्या सिक्वेलमध्ये चुलबुल पांडेची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना त्याची स्टाइल व स्वॅग खूप आवडतात. ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट पोलिसांच्या विश्वाचा एक भाग आहे. यामध्ये सर्व कलाकार पोलिसांच्या भूमिकेत आहेत. अजय बाजीराव सिंघमची भूमिका साकारत आहे तर दीपिका ‘लेडी सिंघम’ची भूमिका साकारत आहे. इन्स्पेक्टर संग्राम भालेराव किंवा ‘सिम्बा’चा रणवीर सिंग, ‘सूर्यवंशी’चा वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमारही दिसणार आहेत. अशा परिस्थितीत रोहित शेट्टीलाही चुलबुल पांडेला त्याच्या चित्रपटात छोट्या भूमिकेसाठी आणायचे आहे.
१२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्याने घेतली होती. सलमानच्या जवळ राहणाऱ्या लोकांनाही इशारा देण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. आता ४० गार्ड आणि वाय कमांडो शेरासह त्याच्या सुरक्षेत सामील झाले आहेत.